…तर मी माफी मागायला तयार:रोहिणी खडसे यांचा टीका करणाऱ्या वकिलांना प्रतिप्रश्न; म्हणाल्या- ‘ते वक्तव्य आपल्याला पटते का?’

…तर मी माफी मागायला तयार:रोहिणी खडसे यांचा टीका करणाऱ्या वकिलांना प्रतिप्रश्न; म्हणाल्या- ‘ते वक्तव्य आपल्याला पटते का?’

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आरोपींचे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारले म्हणजे तो छळ होत नाही, हे मीडिया ट्रायल आहे, असे दुषिंग यांनी म्हटले होते. त्यावरुन, रोहणी खडसेंनी ट्विट करत वकिलांना चपराक लगावली होती. जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार, असे रोहिणी खडसेंनी म्हटले होते. त्यानंतर आता राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. तसेच वकिलांनी त्यांच्या या वक्तव्याला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी प्रतिप्रश्न करत माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात रोहिणी खडसे यांच्यावर वकिलांनी घेतलेल्या आक्षेपानंतर खडसे यांनी एका नव्या पोस्टच्या माध्यमातून वकिलांना प्रतिप्रश्न विचारला आहे. पतीने पत्नीला चार कानाखाली मारणे हरॅसमेंट ठरत नाही, हे वक्तव्य आपल्याला पटते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच जर पटत असेल तर मी माफी मागायला तयार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. तर मी सर्वांची माफी मागायला तयार या संदर्भात खडसे यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी काल केलेल्या पोस्ट मुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचे मला कळले. मुळात मी त्या पोस्टमध्ये कुणाचेही नाव घेतले नाही हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की पतीने पत्नीला चार कानाखाली मारणे हरॅसमेंट ठरत नाही असे त्या ठिकाणी बोलले गेले. माझा समस्त महिलांना आणि त्या वकील भावांना प्रश्न आहे की हे वक्तव्य आपल्याला पटते का ? जर पटत असेल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे.’

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment