संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाचा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला:सुधाकर बडगुजरांनी घेतली फडणवीसांची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरे गटाचा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला:सुधाकर बडगुजरांनी घेतली फडणवीसांची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

कुंभमेळा बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकमध्ये दाखल झाले होते. सोमवारी त्यांच्या पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी होते. याच दिवशी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही नाशिकमध्ये दाखल झाले होते. ते ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यासाठी आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकाच वेळी नाशिकमध्ये उपस्थित असल्याने शहरात नेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. याचवेळी लक्षवेधी घटना घडली ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली, त्यानंतर त्यांच्या हस्ते साईबाबा हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. याच उद्घाटन सोहळ्यात सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले. संजय राऊत स्वतः नाशिकमध्ये असतानाही त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय समीकरणांबाबत नवे तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्त्वाची बाब आहे. काही क्लास वन आणि क्लास टू, क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहे. ते प्रमोशन लवकर व्हावे, याबाबत निवेदन देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संजय राऊत नाशिकमध्ये असताना देखील तुम्ही फडणवीस यांची भेट घेतली, या प्रश्नावर उत्तर देताना सुधाकर बडगुजर म्हणाले, साईबाबा हॉस्पिटलचे उद्घाटन आहे. त्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले होते. मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितली होती की, मला पाच मिनिटांची वेळ द्यावी. त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली. त्या वेळेनुसार मी निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो. आमच्या मागण्याचे निवदेन मी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार हे संजय राऊत यांच्यासह सर्वांना माहिती होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment