‘माझे काय चुकले, तो असाच तडफडून मरेल’:लक्ष्मण हाकेंच्या पत्नीची फोनवरुन महिलेला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

मागील काही दिवसांपासून अजित पवारांवर टीका करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या एका महिलेशी फोनवर बोलताना संतप्त होऊन शिवीगाळ करत असल्याचे ऐकायला मिळत आहे. लक्ष्मण हाकेंविरुद्ध फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीशी बोलताना विजया हाके यांनी संताप व्यक्त करत शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचे सांगत गंभीर आरोप केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही परखड प्रत्युत्तर दिले होते. यावेळी हाके विरुद्ध मिटकरी असा वाद पाहायला मिळाला होता. अमोल मिटकरी यांनी काही शब्दप्रयोग करत हाकेंवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. फेसबुक पोस्टनंतर विजया हाकेंचा संताप लक्ष्मण हाकेंसोबत त्यांचा कार्यकर्ता म्हणून काही काळ काम केलेल्या हनुमंत धायगुडे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांच्यावर सडकून टीका केली होती. हाके हे राखी सावंतप्रमाणे वागत आहेत, टीआरपी आणि प्रसिद्धीसाठी काहीही करतात, असे धायगुडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल करत हा कसा केवळ 50 रुपयांसाठी चाळे करतो, अशा प्रकारचा आशय लिहिला होता. या पोस्टनंतर विजया हाके यांनी संताप व्यक्त करत हनुमंत धायगुडेच्या पत्नीला फोनवर शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय आहे? या कथित ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके या हनुमंत धायगुडे यांच्या पत्नी दिव्या धायगुडे यांच्याशी बोलत असल्याचा दावा केला जात आहे. “तुमच्या मिस्टरांचे काय चालले आहे. तुमचे मिस्टर काहीतरी पोस्ट करत आहेत. हालकट मेला. त्यांना काय कमी पडले होते. मी त्यांच्या आलेल्या प्रत्येक नातेवाईकाला साडी घेतलेली आहे. प्रत्येक नातेवाईकाची उठाठेव केली आहे. माझे काय चुकले गं. कुत्रा मेला. असाच तडफडून मरेल ना. माझे काय चुकले हे सांग. तो असे का करतोय. माझ्या घरात रोज येऊन जेवत होता. मी जॉबला जाते. मला वेळ नसते. मी माझ्या स्वत:च्या कष्टाने काही घेत असेल तर त्या कुत्र्याला काय अडचण आहे. तो कुत्राच आहे. मी त्याला कुत्राच बोलणार. मी त्याला का नीट बोलू. मी त्याला चहा दिला, जेवण दिले. माझी जीभ काळी आहे. तो असाच मरेल, असे शिव्याशाप देताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.