फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला भीषण आग:तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री जवळील दरी फाटा येथे एका प्लास्टिक साहित्य विकीच्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत तिघे जण जळून ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये दरी फाट्यावर प्लास्टिक दुकानाला आग लागली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती दुकान मालक व शेजारी असलेल्या दुकान मालकांना समजली असता ते दुकान उघडण्यास धावले. दुकानाचे शटर उघडताच आतमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे तीन लोक वेगाने बाहेर फेकले गेले, यात ते लोखंडी पार्टवर आदळले तसेच आगीत होरपळले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन रमेश नागरे, राजू सलीम पटेल, गजानन दादाराव वाघ यां तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अजय सुभाष नागरे आणि शाहरुख पटेल हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. फुलंब्री येथे दरी फाटा भागात राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान असून या दुकानात मोठ्या प्रमाण प्लास्टिक साहित्य भरलेले होते. शनिवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी दुकानातील आतील भागात शॉक सर्किट झाले. यामुळे या दुकानाला आग लागली. दुकानात प्लॅस्टिक असल्याने आगीने उग्र रूप धारण केले.