आमदार महेंद्र थोरवे यांना पक्षश्रेष्ठींकडून समज:मंत्री भरत गोगावलेंची माहिती, सुनील तटकरेंना दिली होती औरंगजेबाची उपमा

शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली आहे. थोरवे यांचे वक्तव्य चुकीचे होते, त्यांचे शिवसेना समर्थन करणार नाही, अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीच्या शिवसेना-राष्ट्रवादी या दाेन्ही पक्षांमध्ये वाद रंगला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर रायगडचे शिवसेना नेते भरत गोगावले यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. नेमके महेंद्र थोरवेंचे वक्तव्य काय? आमचा औरंगजेब हा सुतार वाडीत बसला आहे, अशी टीका शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर केली आहे. तर राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी तटकरेंना दिला आहे. महेंद्र थोरवे पुढे बोलताना म्हणाले की, पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवे असे चालणार नाही. क्रिकेट खेळाचे उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये वाद रंगला आहे. नेमके सुनील तटकरेंची टीका काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. यावरुन शिंदे गटाचे नेते महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. जशाच्या तसे उत्तर देऊ- अनिकेत तटकरे महेंद्र थोरवे ही कालची पिलावळ असून हेच गद्दारीचे पिलावळ आहेत, याशिवाय सुनील तटकरे हे राजकारणात 40 वर्ष कार्यरत असून ते जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवे जर का वल्गना करत असतील तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अनिकेत तटकरे यांनी दिला आहे.