आरोपींची नावे देवावरून पण कृत्य वेगळेच:अंजली दमानियांची संतोष देशमुखांच्या आरोपींवर टीका, मनोज जरांगेंची घेतली भेट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अंजली दमानिया यांच्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावल्याचे समजल्यावर अंजली दमानिया यांनी ही भेट घेतली असल्याचे समजते. तसेच यावेळी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील चर्चा झाली आहे. आरोपींची नावे देवावरून पण कृत्य वेगळेच मनोज जरांगे यांची भेट घेतली तेव्हा अंजली दमानिया यांनी तिथे उपस्थितांशी देखील संवाद साधला. यावेळी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नावे देवावरून पण कृत्य वेगळेच केले, अशी टीका संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर केली आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय देशमुख यांना त्यांच्या कुटुंबाची देखील विचारपूस केली. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीबद्दल देखील विचारपूस केली. तसेच इतकी हुशार मुलगी आणि तिचे वर्ष वाया जावे असे मला वाटत नाही म्हणून मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की तिला कसेही करून मेडिकलला अॅडमिशन मिळवून द्या, असे अंजली दमानिया म्हणाल्या. चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो पत्रकारांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीचे समजले म्हणून त्यांना भेटण्यासाठी आले. आम्ही आतापर्यंत कधीही भेटलो नव्हतो, फक्त फोनवर चर्चा झाली होती. म्हणून मी आज ठरवून भेटू घेतली, सगळ्यात चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो. तसेच जालना कारखान्याला सुद्धा भेट द्यायची असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचे देखील अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. पुढची दिशा कशी द्यायची यावर चर्चा झाली – अंजली दमानिया संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, पुढची दिशा कशी द्यायची यावर चर्चा झाली. आरोपी सुदर्शन घुलेचे स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आले, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटले. कारण, त्यात खुनानंतर पुढे काय झाले, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचे बोलणे झाले की नाही याबाबत चकार शब्द सुद्धा स्टेटमेंटमध्ये लिहिलेले नाही. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ताई मुंबईहून आल्या – मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला असता, ते म्हणाले, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ताई मुंबईहून जालन्यात आल्या होत्या. अंजली ताईंच्या कामाचा आवाका मोठा आहे, तरी पण त्यांनी ठरवले भेटायला जाऊ आणि त्या भेटीसाठी आल्या. बीडला शिक्षकाच्या कार्यक्रमांमध्ये माझे अंग गार पडले होते, त्यानिमित्ताने ताई तब्येतीची विचारपूस करायला आल्या दुसरे काही नव्हते, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच ताणून धरले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली असून या प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. कळंब येथे काही दिवसांपूर्वी मनीषा बिडवे नामक महिलेचा खून झाला होता. या महिलेचा संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी वापर केला जाणार होता. या महिलेवर देखील अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. ही महिला पाच नावांनी वावरत होती तसेच पुरुषांना फसवण्याचे काम ही महिला करत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरणी देखील पोलिस तपास करत आहेत.