आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणले, काेर्टाने सुनावली 18 दिवसांची काेठडी:मुंबई हल्ल्यामध्ये राणाला फाशी देण्यात प्रत्यार्पणाचा अडसर नाही

मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रानुसार राणाच्या प्रत्यार्पणासंबंधी अटींत फाशी देऊ नये, असे नमूद नाही. पोर्तुगालहून १९९३ मध्ये बाॅम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला प्रत्यार्पित करण्यात आले होते. तेव्हा त्या देशाच्या अटी होत्या. त्यानुसार भारतातील कोणतेही न्यायालय अबू सालेमला फाशीची शिक्षा देऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर २५ वर्षांहून जास्त शिक्षाही देणार नाही. त्यामुळेच त्यास जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.तेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणाले, २५ वर्षे पूर्ण झाल्यावर त्याची सुटका केली जावी. २०३० मध्ये त्याची शिक्षा पूर्ण होईल. हे लक्षात घेऊन भारताने अमेरिकेला अशा अटी ठेवू नयेत, अशी विनंती केली होती. तिकडे काँग्रेस व भाजप यांच्या प्रत्यर्पणाचे श्रेय घेण्यासाठी शर्यत लागली आहे. काँग्रेसने हे १५ वर्षांच्या परिश्रमाचे फळ असल्याचे म्हटले. भाजपने ही मोठी कामगिरी असल्याचे सांगितले. हेडली अमेरिकन तुरुंगात..त्याचे प्रत्यर्पण का नाही? अमेरिकन न्यायालयाने हेडलीला २०१३ मध्ये ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली म्हणजे २०२४८ पर्यंत तो तुरुंगात राहील. हेडलीने लष्कर व आयएसआयविषयीची माहिती अमेरिकेला दिली होती. परंतु त्यासाठी भारताला प्रत्यर्पित केले जाऊ नये, अशी त्याची अट होती. त्यामुळे भारताकडून वारंवार मागणी केल्यानंतरही हेडलीला सोपवले गेले नाही. राणा पाक सैन्यात १० वर्षे डॉक्टर , पाकमध्ये जन्म राणा लष्करी मेडिकल कॉलेजात शिकला. १० वर्षे तो पाकिस्तानच्या सैन्यात डॉक्टर होता. याच काळात लष्कर संघटनेच्या संपर्कात आला. नोकरी सोडली. भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला. कॅनडा, जर्मनी, इंग्लंडला भेटी दिल्या. ७ देशांच्या भाषाही शिकल्या. लष्कर व हरकतच्या दहशतवाद्यांना मुंबईला पाठवणे आणि त्यांना सर्व प्रकारची लॉजिस्टिक मदत करण्याचे काम तो करत होता. दहशतवादी हल्ल्यानंतर राणाने पाकिस्तान सोडले आणि कॅनडाचे नागरिकत्व घेतले. हल्ल्याची साक्षीदार देविका रोटवान म्हणाली- तहव्वूर राणाला फाशी द्यावी २६ नोव्हेंबर २००८ रोजी कसाब खुलेआम गोळीबार करत असताना तेव्हा ९ वर्षे ११ महिने वय असलेल्या देविका रोटवानने पाहिला होता. तिने कोर्टात कसाबला ओळखले होते. तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या घटनेबद्दल ती म्हणाली की, सरकारने राणाकडून त्या क्रूर कटाचा सर्व तपशील वदवून घ्या आणि त्याला फाशी द्यावी. त्या हल्ल्यात मला गोळी लागली होती. कसाबला गोळीबार करताना मी माझ्या डोळ्याने पाहिले होते. माझ्यासमोर कित्येक मृतदेह पडले होते. तेव्हा मला भिती वाटली होती. तिहारमध्ये ठेवले, ‘स्पेशल १२’ तिहारमध्ये राणासाठी एक हाय-सिक्युरिटी इंटरोगेशन सेल बनवला आहे. त्यात केवळ १२ अधिकाऱ्यांना परवानगी आहे. त्यात राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) डी.जी. सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा, डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे. हेडलीने भारताला ८ वेळा भेट दिली. त्यात राणाला २३१ वेळा कॉल केला होता. पुढे काय ? दिल्ली हायकोर्टाचे वकील मनीष भदौरिया म्हणाले, राणाला रिमांडवर घेतल्यानंतर एनआयए चौकशी करेल. रिमांडनंतर न्यायालयीन कोठडी असेल. नंतर १८० दिवसांत आरोपपत्र व पुढे सुनावणी सुरू होईल. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार हेडली जबाबात म्हणाला, २६ ते २८ नाेव्हेंबर २००८ दरम्यान “लष्कर’च्या अजमल कसाबसह १० दहशतवाद्यांनी मुंबईत ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ले केले. मी या ठिकाणी रेकी केली होती. राणाने मला भारताचा व्हिसा मिळवून देण्यात मदत केली होती. सोबतच मुंबईत कार्यालय मिळवून देण्यातही मदत केली होती. मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू तर २३८ जण जखमी झाले होते. मुख्य कट रचणाऱ्या हेडलीने सांगितली राणाची भूमिका मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा (६४) यास अमेरिकेहून भारतात आणण्यात यश मिळाले. २०११ मध्ये अमेरिकन कोर्टाने त्याची २६/११ मध्ये कटात सहभागातून सुटका केली होती. परंतु इतर दहशतवादी प्रकरणांत १४ वर्षांची शिक्षा केली. मे २०२३ मध्ये अमेरिकी कोर्टाने त्यास प्रत्यार्पणासाठी योग्य ठरवले. गुरुवारी संध्याकाळी ६:२२ वा. त्याला विशेष विमानाने दिल्लीला आणले. ३.३० तास विमानतळावर होता. त्या रात्री १०.३० वा. त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. एनआयएने २० दिवसांच्या काेठडीची मागणी केली. ही सुनावणी दीड तास चालली. रात्री २ वाजेच्या सुमारास काेर्टाने त्याला १८ दिवसांची काेठडी सुनावली. त्यानंतर त्याला एनआयए मुख्यालयात नेण्यात आले.