अचलपूर तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट:गहू, कांदा, संत्रा आणि टरबूज पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची चिंता वाढली

अचलपूर तालुक्यात शनिवारी दुपारी वादळी वारा आणि गारपिटीने थैमान घातले. चमक, सुरवाडा, खंबोरा, पोही, तुळजापूर, बोपापूर, नायगाव बोर्डी, खोजनपूर आणि पथ्रोट या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे संत्र्याची फळे झाडावरून खाली पडली. टरबुजे फुटून खराब झाली. संत्रा बागांमधील झाडांचेही मोठे नुकसान झाले. कापणीपूर्व अवस्थेत असलेल्या उन्हाळी ज्वारी आणि गहू पिकांचा दर्जा खराब होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने उभी केलेली पिके एका पावसात नष्ट झाली. संत्रा आणि टरबूज ही नगदी पिके असल्याने नुकसान दुप्पट झाले आहे. तालुक्यातील नऊ गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी नैसर्गिक आपत्तीचा अहवाल लवकर तयार करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी तालुक्यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचेही स्पष्ट केले.