आदिल शाहच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून घर:पर्यटकांना वाचवताना झाली होती हत्या, अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा केला होता प्रयत्न

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावेळी आदिल शाह यांचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू झाला होता. अतिरेक्यांनी आदिल शाह यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता आदिल शाहच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घर बांधून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आदिल शाह यांच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आदिल शाह यांच्या बंधूशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांची विचारपूस केली तसेच कुटुंबीयांनी शिंदेंचे आभार मानले. यावेळी आदिल शाह यांच्या भावाने हल्ल्यावेळी नेमके काय घडले याची माहिती एकनाथ शिंदे यांना दिली. आदिल शाह हा घोडा सवारी करण्यासाठी तिथे गेला असताना दुपारी 2 च्या सुमारास हल्ला झाला. आम्ही त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कॉल लागत नव्हता, अशी माहिती आदिल शाह यांच्या भावाने एकनाथ शिंदे यांना दिली. पुढे त्यांनी सांगितले की. संध्याकाळपर्यंत आम्ही त्याची वाट बघत बसलो. नंतर 5 वाजता मी इथल्या स्थानिक पोलिस ठाण्यात गेलो व तिथे हरवला असल्याची तक्रार दाखल करून घ्यायला सांगितली. तसेच मी पोलिसांना मला पहलगामला जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी घरी जाण्यास सांगितले. आम्ही तपास करतो आणि तुम्हाला कळवतो असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मी पहलगाम येथे काही ओळखीच्या लोकांना आदिलचा फोटो पाठवला आणि काही माहिती मिळाली तर कळवण्यास सांगितले. जेव्हा मृतदेह श्रीनगरला आणण्यात आले तेव्हा आम्ही सगळे तिकडे गेलो. तेव्हा तिथे एक महिला रडताना दिसली. त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती. मी त्यांना शांत राहण्यास सांगितले, माझा पण भाऊ मारला गेला आहे. जास्त रडून तब्येत खराब होईल, तुम्ही थोडे शांत व्हा, अशी मी त्यांची समजूत काढली. तेव्हा त्यांनी विचारले की ज्याने आम्हाला मदत केली तो तुमचा भाऊ होता, मी हो म्हटले. त्यानंतर त्यांनी आदिलने कशी मदत केली ते सांगितले, अशी माहिती आदिलचे भाऊ एकनाथ शिंदे यांना देत होते. आदिल यांचे भाऊ पुढे म्हणाले, जेव्हा हल्ला झाला तेव्हा सगळे लोक पाळायला लागले, आपला जीव वाचवण्यासाठी. जेव्हा या महिलेच्या वडिलांना गोळी लागली तेव्हा आदिलने त्यांना पकडले व तिथून जाण्यास सांगितले. आदिलने त्यांना सांगितले की यांचा मृत्यू झाला आहे, तुम्हाला पण हे मारून टाकतील तुम्ही इथून पळून जा. तेवढ्यात हल्लेखोर आदिलच्या तिथे आले तेव्हा आदिलने त्यांचे हातातील बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा अतिरेक्यांनी 4 गोळ्या आदिलवर झाडल्या. आदिलच्या बोटांना व हाताला बंदुकीचा काळा रंग देखील लागलेला होता आणि बोट जखमी झाले होते, अशी माहिती आदिल यांच्या भावाने दिली.