प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाद फेरीत यु मुम्बाचा प्रवेश:बंगाल वॉरियर्सवर मिळवला 36-27 असा विजय
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश करण्याचा अखेरचा मान यु मुम्बाने मिळविला. लीगच्या ११व्या पर्वात झालेल्या सामन्यात यु मुम्बाने बंगाल वॉरियर्सचा ३६-२७ असा पराभव केला. या विजयाने यु मुम्बाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. यु मुम्बा संघाने सातव्या पर्वानंतर प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला. यु मुम्बा बाद फेरीत प्रवेश करणार हे निश्चित होती. यु मुम्बाने आज केवळ त्याची औपचारिकता पूर्ण केली. यु मुम्बाला बाद फेरी गाठण्यासाठी केवळ एक गुण आवश्यक होता. अखेरच्या दहा मिनिटांत बंगाल वॉरियर्सच्या बचावफळी आणि प्रणय राणेच्या चढाईने यु मुम्बाच्या संयमाची कसोटी पाहिली. अखेरच्या सत्रात एकवेळ बंगालने ११ गुणांचा सपाटा लावला. यु मुम्बा त्या वेळेस केवळ दोनच गुण मिळवू शकला होता. पण, तोवर वेळ संपत चालल्यामुळे यु मुम्बा संघाला सुटकेचा निश्वास टाकता आला. पूर्वार्धातच काहिशा संथ सुरुवातीनंतर यु मुम्बाने अजित चौहानच्या चढाया आणि सुनिल कुमारच्या बचावाने यु मुम्बाने हळू हळू सामन्यावर नियंत्रण मिळविले आणि नंतर वर्चस्व राखले. पूर्वार्धात एक लोण देत त्यांनी मध्यंतराचा १८-१० अशी मोठी आघाडी मिळवली. उत्तरार्धात फार वेगळे चित्र दिसले नाही. यु मुम्बाने सामन्यावरील नियंत्रण निसटणार नाही याची काळजी घेतली. उत्तरार्धात झफरदानेशच्या चढाया निर्णायक ठरल्या. सुनिल कुमार आणि परवेश बैन्सवाल या दुकडीचा बचाव या सत्रातही बघायला मिळाला. एकूणच यु मुम्बा संघाने नियंत्रणपूर्वक खेळ करताना विजयाची नोंद केली. बंगाल वॉरियर्सकडून केवळ प्रणय राणेला, नितेश राणेलाच छाप पाडता आली. चढाई आणि बचावातील त्यांची लढत बंगालसाठी निर्णय बदलू शकली नाही. नितेश कुमारने (८) हाय फाईव्ह पूर्ण केले, तर प्रणयने (१२) सुपर टेनची कामगिरी केली. अर्थात, उत्तरार्धात त्यांना यु मुम्बावर लोण चढविण्याचे समाधान लाभले.