अहिल्यानगर मनपा क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण करावे- देशमुख

अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी नूतन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली. डॉ. पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशमुख यांनी त्यांची आज सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी देशमुख यांनी डॉ. आशिया यांच्याशी प्रामुख्याने जिल्ह्यातील एकल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाबाबत चर्चा केली. देशमुख म्हणाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकल (विधवा , घटस्फोटीत, परित्यक्त्या) महिलांचे सर्वेक्षण झाले असून ही संख्या ९६ हजारपेक्षा जास्त आहे. अहिल्यानगर महापालिका क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण बाकी असून हे तातडीने होणे गरजेचे आहे.” अशी अपेक्षा देशमुख यांनी डॉ. आशिया यांचे कडे व्यक्त केली. यासंदर्भात लवकरात लवकर सर्व संबंधितांची बैठक बोलावण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व मनपा आयुक्त यशवंत डांगे हे उपस्थित होते.