आईच्या गर्भातच आत्महत्या, तरी पाझर फुटत नाही का?:उद्योगपतीच्या दलालांनो कुठे फेडाल हे पाप? राजू शेट्टींचा संतप्त सवाल

परभणी जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली. मयत शेतकरी महिला 7 महिन्याची गरोदर होती. ज्याने जगही बघितलं नव्हत त्या आसराफ जीवाला आईच्या गर्भातच आत्महत्या करावी लागली. तरीही तुम्हाला पाझर फुटत नाही का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. उद्योगपतीच्या दलालांनो कुठे फेडाल हे पाप? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात असून शेतकरी कर्ज माफीला मात्र, नकार दिला जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले आहेत. यामध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्याचे चित्र मांडत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे. देशातील मुठभर उद्योगपतींच्या 16 लाख कोटी कर्जावर तुम्ही पाणी सोडता मग शेतकऱ्याचे कर्ज तर त्याच्या दोन टक्के सुद्धा नसल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. राजू शेट्टी यांनी केलेली पोस्ट देखील पहा… प्रिय मोदीजी, निर्मलाजी, देवेंद्रजी, एकनाथजी व अजितदादा…… देशातील मुठभर उद्योगपतींच्या १६ लाख कोटी कर्जावर पाणी सोडलात. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे, अस्मानी सुल्तानी संकटामुळे आर्थिक संकाटात सापडलेल्या ढीगभर शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवलात. महाराष्ट्रातील शेतक-यांच कर्ज या रक्कमेच्या २ टक्के सुध्दा नाही. कर्जापायी बाप लेकान एकाच दोरीला गळफास लावून आपल जीवन संपविल. कालच परभणी जिल्ह्यातील शेतकरी दांम्पत्यान आत्महत्या केली. मयत शेतकरी महिला ७ महिन्याची गरोदर होती. ज्यान जगही बघितल नव्हत त्या आसराफ जीवाला तुमच्या धोरणामुळे आईच्या गर्भातच आत्महत्या करावी लागली. तरीही तुम्हाला पाझर फुटत नाही का? आरे उद्योगपतीच्या दलालांनो कुठे फेडाल हे पाप.