अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची गाडी:त्याच गाडीतून पुण्यात सरेंडर केले, खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
बीड सरपंच हत्याप्रकरणाशी निगडीत खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे. बीड खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराड आणि अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची देखील गाडी होती, असे सोनवणे म्हणालेत. त्याच गाडीतून त्याने पुण्यात सरेंडर केले, असा दावाही बजरंग सोनवणे यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वाल्मीक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यात आता खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड सरेंडर झालेल्या गाडीविषयी मोठा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले बजरंग सोनवणे?
12 तारखेला वाल्मीक कराड आणि पोलिस यंत्रणेची नेत्याच्या कार्यालयात भेट झाली. तसेच 15 तारखेला मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासाठी आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता, असा दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता. हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली. त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला. त्यानंतर आरोपी शपथविधीला पोहोचतो, तेव्हा अटक का झाली नाही? वाल्मिक कराडचा हा परळीतून पुण्याला जातो, मग गोवा आणि पुन्हा पुण्याला येतो. त्याचा हा प्रवास सुरु असताना पोलिस काय करत होते? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे. अजित पवार 16 तारेखला मस्साजोगला आले, तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, त्याच गाडीतून जाऊन आरोपी पुण्यात सरेंडर केले. गाडी कोणाच्या नावावर आहे? असा सवाल करत पुण्यात आरोपी ज्या घरात थांबला त्याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली. …म्हणून संतोष देशमुखांना मारले
संतोष देशमुख यांना खंडणीच्या प्रकरणामुळे मारले आहे. आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला तर काय होतं, हे दाखवण्यासाठी असे मारले आहे. मागच्या मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता, तेव्हा जर कारवाई झाली असती तर हे सगळे घडले नसते. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे झाले नसते, असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला.