अजित पवारांचे कर्जमाफीबाबतचे वक्तव्य विचारपूर्वक:अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा विचार – गिरीश महाजन

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याच वर्षी काय? पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे थेटच सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाचे पैसे 31 तारखेच्या आत भरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता, अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे काही वक्तव्य केले असेल ते विचारपूर्वक केले असेल, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारच्या वतीने तशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात तरी शेतकऱ्यांना तसा दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अर्थसंकल्पात देखील शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आला नाही. यानंतर आता अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगितले. नेमके काय म्हणाले गिरीश महाजन? अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे काही वक्तव्य केले असेल ते विचारपूर्वक केले असेल. लाडकी बहीण योजनेचे राज्यात 41 हजार कोटींचे बजेट आहे. त्यामुळे कदाचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर त्यांनी हे वक्तव्य केले असावे. एक-दोन वर्षात अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफीचा विचार केला जाईल, असे मंत्री महाजन म्हणाले. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतही मोठे विधान केले आहे. पुढील पाच वर्षात कधीही आणि केव्हाही 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात होईल, असे गिरीश महाजन म्हणाले. स्पष्टपणे बहुमत असल्याने सरकार पाच वर्षे काम करणार असल्याचेही ते म्हणाले. वायफळ बडबड करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे
महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, खासदार उदयनराजे भोसले म्हणतात ते बरोबर आहे. वारंवार महापुरुषांचा अवमान केला जात आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. वायफळ बडबड करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून पुढच्या काळात बोलताना कोणाची हिंमत होणार नाही, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. मुख्यमंत्र्यांकडूनही अजित पवारांच्या विधानाचे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आगामी तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी होणार नाही, हे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी शेतकरी कर्जमाफीबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. अजितदादांची जी भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका आहे, अजितदादांनी कधीही शक्य नाही, असे म्हटलेले नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.