अजित पवार यांचा शरद पवार यांना फोन:तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती; डॉक्टरांनी दिलाय आराम करण्याचा सल्ला
![अजित पवार यांचा शरद पवार यांना फोन:तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती; डॉक्टरांनी दिलाय आराम करण्याचा सल्ला](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/01/27/730-x-548-2025-01-27t073602357_1737943551.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धावपळ न करता तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली आहे. शरद पवार आणि अजित पवार गेल्या काही दिवसात सातत्याने एकाच व्यासपीठावर येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या दरम्यान त्यांच्यामध्ये कोणतेच संभाषण झाले नसल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला चांगले यश मिळाले होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला भरघोस यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आता हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यादरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता पुन्हा एकदा शरद पवार यांची प्रकृती खराब झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे काका-पुतणे लवकरच एकत्र येतील का? याबाबत तर तर्क वितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीही बिघडली होती प्रकृती उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळीही शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निवडणुकीत झालेल्या सततच्या सभा, दगदग यामुळे शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना उन्हाचा त्रास झाला आहे, अशी माहिती त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली होती. अजित पवारांसोबत आले होते एका व्यासपीठावर शरद पवार परवा पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका व्यासपीठावर आले होते. यावेळी अजित पवारांनी त्यांच्यासोबत बसणे टाळले होते. पण त्यानंतर शरद पवार व अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर हे चुलते – पुतणे पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी अजितदादांशी केवळ संस्थात्मक मुद्यांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले होते.