अजित पवारांना ठाकरे गटाच्या कौतुकाचा धक्का:म्हणाले – त्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले, पण त्यामागे काही वेगळी भावना आहे का?

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी बजेटच्या केलेल्या कौतुकावर आश्चर्य व्यक्त केले. भास्कर जाधव व इतर सदस्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. पण त्यांच्या या कौतुकामागे काही वेगळी भावना होती का? हे मला माहिती नाही, असे ते म्हणाले. गत काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना बजेटचे कौतुक केले होते. त्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता भारावून गेला अजित पवार याविषयी बोलताना म्हणाले की, महायुतीच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करणे मी समजू शकतो. कारण ते आमच्या सरकारमधील पाठिंबा देणारे घटक आहेत. पण भास्कर जाधव व इतर सदस्यांनीही कौतुक केले. त्यांनी खरोखर कौतुक केले की, त्यामागे काही वेगळी भावना आहे? हे मला माहिती नाही. पण यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता भारावून गेला आहे. जयंत पाटलांना टोला जयंत पाटील इथे नाहीत. ते ही त्यांच्या स्वभावाला अनुसरून उपरोधिकपणे झालर देण्याचा प्रयत्न करतात. सर्व मंत्र्यांना आता अजित पवारांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले म्हणालेत. ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतो, तेव्हा बाकीच्या मंत्र्यांनी त्यांना शरण जायचे असते का? त्यामुळे अशा शब्दांचा वापर करणे योग्य नाही. आम्ही नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सर्व सांगतात की आमच्यात एकी आहे, वाद नाहीत. पण त्यानंतरही वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या रंगवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला काहीही अर्थ नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर ‘बडा घर पोकळ वासा’, ‘मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी’ असेही काहीजण म्हणाले. विविध राजकीय व्यक्तींनी, कृषी, उद्योग, सेवा, शिक्षण तज्ज्ञांनी अर्थसंकल्पाची दखल घेतली. त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केली. कोणताही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूने बोलले जाते. विरोधक त्यावर टीका करत असतात. राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा हा अनुभव आहे. अर्थसंकल्पाच्या स्वागताचे आणि कौतुकाचे प्रमाण वेगवेगळे मिळाले. त्यामुळे आम्हाला काम करताना ऊर्जा मिळते, असे अजित पवार म्हणाले. हे काय, कमी मजसाठी, मी तुम्हा, आवडलो आहे! अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा आधार घेतला होता. त्यानुसार त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतानाही काव्यांजली सादर करत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, काही लोकांनी अर्थसंकल्प विचार करून सादर केलेला व संतुलित असल्याची प्रतिक्रिया दिली. माझा उत्साह वाढवणाऱ्यांसाठी मला एकच म्हणावेसे वाटते… ऐकल्या, शिव्या दुनियेच्या, जाहली, जरी बदनामी, हे काय, कमी मजसाठी मी तुम्हा, आवडलो आहे, अशी चारोळी अजित पवारांनी सभागृहात ऐकून दाखवली. त्यांच्या या चारोळीवर अनेकांनी मनमुराद दादही दिली.