अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा:तर पटेलांचा पलटवार; लाखभर मतांनी विजयी होण्याचा विश्वास
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात हॉट सीट ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हे चाळीस हजार मतांनी पराभूत होणार असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केला आहे. अजित पवार यांना मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत, असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे बारामतीमधील जनता शरद पवार यांना मतदान करणार असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र त्यांच्या या दाव्या नंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. मात्र या मतदारसंघात आता शरद पवार यांच्या विरोधात अजित पवार असाच सामना पाहायला मिळाला होता. यात बारामती मधील जनता ही शरद पवार यांचा साथ देईल, असा दावा जानकर यांनी केला आहे. या मतदारसंघाने अनेक वर्षे राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात जनता ही शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचा दावा जानकर यांनी केला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 180 ते 200 जागा नक्की निवडून येतील, असा दावा देखील त्यांनी केला. तर युगेंद्र पवार हे चाळीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचे देखील ते म्हणाले. लाखभर मतांनी निवडून येतील – पटेल जानकर यांच्या या दाव्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील दावा केला आहे. अजित पवार हे किमान लाखभर मतांनी निवडून येतील, असा दावा त्यांनी केला आहे. शरद पवारांपासून ते आतापर्यंत पवार कुटुंबातील सर्वांशी माझे चांगले संबंध राहिले आहेत. मी त्यांचा एक फॅमिली मेंबर आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार हे भरघोस मतांनी नक्की निवडून येतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे. कोणालाही चिंता करण्याचे कारण नाही. उगाचच चर्चांना उधान आले असल्याचे देखील ते म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावा देखील पटेल यांनी केला आहे.