अकोल्यात 50 महिलांनी सोडली लाडकी बहीण योजना:जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची माहिती, सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद

विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली होती. या योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत 7 महिन्यांचे हफ्ते लाडक्या बहीणींच्या बँक खात्यात जमा देखील झाले आहेत. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. आता सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी पत्रतेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींनी स्वात:हुन योजनेचा लाभ सोडावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार आता काही लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ सोडण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. अकोला येथील जवळपास 50 महिलांनी योजनेचा लाभ सोडला असल्याचे समोर आले आहे. अकोला येथील जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील 50 महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिली आहे. ज्या महिलांना रोजगार तसेच नोकरी व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे, तसेच काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ मिळत आहे, अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहे. त्यानुसार आता महिलांनी स्वतःहूनच अर्ज मागे घेण्यास सुरू केले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांची शासन स्तरावर पाठवून डीबीटी मार्फत नाव वगळण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे, अशाही महिलांची नावे योजनेसाठीच्या यादीतून वगळण्यात येणार असल्याचे समजते.

  

Share