अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ:आता 5 जूनपर्यंत करता येणार नोंदणी, इन-हाऊस कोट्याच्या नियमात सुधारणा

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात 31 मे 2025 रोजी एक सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्य शासनाने इन-हाऊस कोट्याच्या जागा भरण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, विद्यार्थी नोंदणीसाठी 3 जून 2025 ही अंतिम तारीख होती. मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक वेळ देत ही मुदत 5 जून 2025 रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. इन-हाऊस कोट्याच्या नियमात सुधारणा नवीन निर्णयानुसार, खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. मुंबई शहर, उपनगर व ठाणे जिल्ह्यांत एका संस्थेची शाळा व कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालय यांचा एक युनिट ग्राह्य धरला जाणार आहे. इतर जिल्ह्यांत महसूली जिल्हा हे इन-हाऊस कोट्यासाठी युनिट मानले जाईल. पसंतीक्रमात बदल करता येणार महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न शाळांनी जर इन-हाऊस कोट्यांत बदल केल्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमात सुधारणा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. इन-हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक तसेच विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रवेशासाठी अधिकृत संकेत स्थळ पाहा इयत्ता 11 वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणेच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 2 जूनपर्यंत 10 लाख 85 हजाराहून अधिक नोंदणी 2 जून 2025 सायंकाळपर्यंत राज्यभरातून 10 लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. विभागानुसार आकडेवारी खालीलप्रमाणे: मुंबई विभाग – 2,65,900 पुणे विभाग – 1,87,925 कोल्हापूर विभाग – 1,07,012 छत्रपती संभाजीनगर विभाग – 1,00,040 नाशिक विभाग – 1,12,108 नागपूर विभाग – 95,210 अमरावती विभाग – 98,359 लातूर विभाग – 58,586 इतर – 61,712 अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन क्रमांक 8530955564 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.