अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत:त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका, अजित पवारांचा नेत्यांना टोला

अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पाया पडायच्या नादात पडू नका, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांची लायकीच काढली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार बोलत होते. काम करताना चुकीचे वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, असा सल्लाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला. नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश झाले. त्यानंतर आज देखील पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जोरदार फटकेबाजी केली. नेमके काय म्हणाले अजित पवार? काम करताना चुकीचे वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, बोलता बोलता चुकीचा शब्द बाहेर पडतो, त्यामुळे प्रॉब्लेम होतात ते व्हायला नको, असा सल्ला अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. आपल्याला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आपण शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत हे सांगता आले पाहिजे. अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत, पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली पाहिजे, असेही ते म्हणाले. पुढाऱ्यांच्या पाया पडायच्या भानगडीत पडू नका अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत, पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली पाहिजे. आधीच कोणी चुकी केली असेल आणि मग त्याचा विचार असेल की, सत्ताधारी पक्षात जाऊ, असे असेल तर तसे होणार नाही. उद्या पेपरात फोटो यायचा अमुक पक्ष प्रवेश झाला म्हणून. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आले पाहिजे. कारण आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत. उद्या जर आपला माणूस चुकला तर कायदा आहे. डॉ. बाबासाहेबांचा कायदा आहे, कोणीही सुटणार नाही. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाहीत, त्यामुळे त्याच्या पाया पडायच्या भानगडीत पडू नका, असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला. आपल्याला सामंजस्याने भूमिका घ्यायची आहे आज केंद्रात स्थिर सरकार आले आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली. काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळे तसे सांगणे गरजेच असते, काही वेळा लोकांना वाईट वाटते. सेवा दलाचे काम अधिक पुढे कसे घेऊन जाता येईल याचा विचार करावा लागेल. आता नवी पिढी फार कमी येत आहे, उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे, मी काल नांदेडला जाऊन आलो अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, पण आपल्याला सामंजस्याने भूमिका घ्यायची आहे. आपण महायुतीत आहे त्यामुळे तसेच काम करायचे आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले. विरोधकांवरही साधला निशाणा अजित पवारांनी यावेळी बोलताना विरोधकांवरही निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत अपयशी पडताना पाहायला मिळत नाही. विरोधी पक्ष सभागृहात उपस्थित राहत नाही, लोकशाही आहे त्यांचा अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.