सर्व पक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे गटाची दांडी का?:खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले खरे कारण; सरकारला पाठिंबा जाहीर

सर्व पक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे गटाची दांडी का?:खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले खरे कारण; सरकारला पाठिंबा जाहीर

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने नवी दिल्ली येथे देशातील सर्व पक्षीय बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या सह देशभरातील सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे गटाचा एकही नेता या बैठकीला उपस्थित राहिला नाही. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र या बैठकीला का उपस्थित राहिलो नाही? याबाबत उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या संदर्भात अरविंद सावंत यांनी सांगितले की, आपण या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतो का? अशी विचारणा केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यावर मंत्री किरण रिजिजू यांनी या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून आपण यावर नंतर सविस्तर बोलू असे उत्तर दिले होते. या संदर्भात अरविंद सावंत हे स्टॅंडिंग पार्लमेंटरी कमिटीचे सदस्य देखील आहेत. या कमिटीच्या कामानिमित्त ते बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ठाकरे यांच्या पक्षाचा एकही खासदार उपस्थित नव्हता या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या दोन सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यातील अरविंद सावंत हे स्टॅंडिंग कमिटीच्या कामानिमित्त बाहेर होते. तर दुसरीकडे संजय राऊत हे देखील स्टॅंडिंग कमिटीच्या कामासाठी बाहेर असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. पक्षाच्या वतीने दुसऱ्या खासदाराला बैठकीला पाठवू का? असा प्रश्न विचारला असता सरकारच्या वतीने दोन्ही सभागृहाचा नेता किंवा तुमच्या पक्षाचे नेते या बैठकीला आले पाहिजे, असे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एकही खासदार या बैठकीला उपस्थित नव्हता, असे स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिले आहे. आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल उद्धव ठाकरे गटाचा एकही खासदार या बैठकीला उपस्थित नसला तरी देखील केंद्र सरकार या संदर्भात जी काही पावले उचलेल, त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल, असे देखील अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षा संदर्भात काही प्रश्न आम्ही उपस्थित केले असल्याचे देखील अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. नेमके काय म्हणाले अरविंद सावंत ते देखील पहा… या संदर्भात सावंत यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली… ह्या दुर्दैवी, भयंकर हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. पहलगाम घटनेसंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीचे आमंत्रण मला आज सकाळी सन्मा. मंत्री किरेन रिजिजू जी ह्यांनी दिले. संसदीय समिती बैठकीसाठी मी दुर्गम स्थानी असुन दिल्ली येथे पोहोचणे शक्य नाही. तरी आपण कृपया सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ह्या बैठकीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, ही विनंती केली. त्यांनी धन्यवाद मेसेज करून बैठकीच्या इतिवृत्ताबद्दल कळवितो, अशी प्रतिक्रिया देखील दिली. ह्या घटनेवरून देखील कोणी राजकारण करीत असेल तर ते निंदनीय आहे! शिवसेना अजुनही ह्या लोकांना कळलेली नाही. शिवसेना अंगावर घेणारी आहे, ढकलणारी नाही!!! देशावर झालेल्या ह्या अमानुष आणि भ्याड हल्ल्याला सरकारकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही कठोर प्रत्युत्तराला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment