आंबेडकर हे देवच, अमित शहा देवाचा अपमान का करता?:उद्धव ठाकरे गटाचा प्रश्न; पोटातले विष असे बाहेर पडल्याचा आरोप

आंबेडकर हे देवच, अमित शहा देवाचा अपमान का करता?:उद्धव ठाकरे गटाचा प्रश्न; पोटातले विष असे बाहेर पडल्याचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन आहे असे ज्यांना वाटते अशा ‘मनु’वाद्यांचे राज्य महाराष्ट्रात व देशात आहे. आंबेडकरांच्या अनेक अनुयायांनी मोदी–फडणवीस यांचे राज्य यावे म्हणून प्रतारणा केली. ते आता तरी शहाणे होतील काय? डॉ. आंबेडकरांनी वंचित, पीडितांच्या जीवनातला नरक नष्ट करून त्यांना स्वर्ग दाखवला. आंबेडकर हे देवच आहेत. अमित शहा, देवाचा अपमान का करता? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने विचारला आहे. दैनिक सामनाच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर टीका केली. सामना मधील अग्रलेख देखील वाचा….. संसदेत भारतीय संविधानावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अमित शहा यांनी ‘संविधान’ निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. डॉ. आंबेडकरांचा अपमान म्हणजे देशातील कोट्यवधी वंचित, दलित, शोषितांचा अपमान आहे. गृहमंत्री अमित शहा हे गुजरातचे व्यापारी आहेत. राजकारण हा त्यांचा धंदा आहे. त्याच धंदेवाईक मस्तवालपणात ते म्हणाले, ‘‘आंबेडकर, आंबेडकर काय करता? आंबेडकरांचा नामजप करणं ही आता फॅशन झाली आहे. काँग्रेसने आंबेडकरांऐवजी देवाचा नामजप केला असता तर त्यांना स्वर्ग दिसला असता.’’ हे वक्तव्य म्हणजे विष आहे. अमित शहांच्या पोटातले विष असे बाहेर पडले. डॉ. आंबेडकर हे फक्त दलित बांधवांचेच नव्हे, तर समस्त मानव जातीचेच देव आहेत. डॉ. आंबेडकर यांच्याविषयी भाजपच्या मनात कायम द्वेष होताच, पण राजकीय सोयीसाठी ते आंबेडकरांचे नाव आतापर्यंत घेत राहिले. तरीही नकळत का होईना, भाजपचे आंबेडकर प्रेमाचे ढोंग उघडे पडलेच! लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘चारशे पार’चा नारा दिला. हे चारशे पार झाले असते तर डॉ. आंबेडकरांचे संविधान त्यांनी फेकून नवे संविधान लिहायला घेतले असते. जनतेने चारशे पार रोखले. त्याचा राग ते डॉ. आंबेडकरांवर काढत आहेत. दलितांवर सर्वाधिक अत्याचार भाजपशासित राज्यांत भारतीय जनता पक्षाच्या विद्वानांनी डॉ. आंबेडकरांची सतत निंदा-नालस्ती केली. ब्रिटिश सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री असताना 1942 मध्ये अच्युतराव पटवर्धनांसारख्या काँग्रेसच्या भूमिगत पुढाऱ्यांना आपल्या घरी आश्रय देण्याचे धाडस डॉ. आंबेडकरांनी दाखविले होते. तरीही भाजप विचाराच्या लेखक, संशोधक मंडळींनी डॉ. आंबेडकर यांना ब्रिटिशांचे हस्तक ठरविण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांच्या विचारांबाबत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ‘संघ’ मंडळींनी केला. आज दलितांवर सर्वाधिक अत्याचार भाजपशासित राज्यांत होत आहेत. सार्वजनिक पाणवठ्यावर जाऊन दलितांची मुले पाणी प्यायली म्हणून त्यांना भाजपचे लोक मारहाण करतात, धिंड काढतात. मोदी-शहांच्या गुजरातमध्ये अशा घटना जास्त आहेत. त्यामुळे अशा स्वातंत्र्याचा धिक्कार डॉ. आंबेडकरांनी केला. भाजप विचारांच्या लोकांनी आंबेडकरांची बदनामी सुरूच ठेवली गोलमेज परिषदेत केलेल्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले होते, ‘‘इंग्रज येण्यापूर्वी आमच्या समाजाची जी स्थिती होती व इंग्रज आल्यानंतर आमच्या समाजाची जी स्थिती आहे, याची तुलना ज्या वेळी आम्ही करतो, त्या वेळी आम्हाला दिसते की, आमची स्थिती सुधारलेली नाही. इंग्रज येण्यापूर्वी अस्पृश्यता होती. अस्पृश्यता घालविण्यासाठी इंग्रजांनी काही प्रयत्न केले का? इंग्रज येण्यापूर्वी आम्हाला विहिरीचे पाणी काढता येत नसे. आम्हाला मंदिरात जाता येत नसे. पोलिसांच्या नोकऱ्यांत आम्हाला प्रवेश नव्हता. सैन्यात घेतले जात नसे. इंग्रज आल्यानंतर यात काही फरक पडला आहे का? ब्रिटिश येऊन दीडशे वर्षे झाली, परंतु आमच्यावरचा एकही अन्याय दूर झालेला नाही. असे ब्रिटिश सरकार असून त्याचा काय उपयोग आहे? भांडवलशहा कामगारांना जीवनावश्यक पगार देत नाहीत. जमीनदार शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. या गोष्टी काय सरकारला माहीत नाहीत? या गोष्टींबद्दल सरकारला अधिकार आहेत, पण सरकारने ते अधिकार वापरलेले नाहीत.’’ डॉ. आंबेडकरांचे हे परखड विचार असतानाही भाजप विचारांच्या लोकांनी आंबेडकरांची बदनामी सुरूच ठेवली. आंबेडकरांच्या कोणत्याही सामाजिक सुधारणेच्या चळवळीत संघ विचाराचे लोक कधीच नव्हते. घटना समितीतील शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, ‘आपल्यातल्या फितुरीमुळे पूर्वी आपण आपले स्वातंत्र्य गमावले होते. ‘मनु’वाद्यांचे महाराष्ट्रात व देशात राज्य इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे का? तसे झाले तर दुसऱ्यांदा आपण आपले स्वातंत्र्य गमावू आणि ते मग कायमचेच गमवावे लागेल. म्हणून आपण आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे.’ असे प्रखर राष्ट्रवादी विचारांचे डॉ. आंबेडकर हे ढोंग व असत्याच्या विरोधात होते. समाजातील दुःखी, पीडित, उपेक्षित आणि कमकुवत घटकांना आपल्या हक्कांसाठी लढायला डॉ. आंबेडकरांनी शिकविले. तो लढा आजही संपलेला नाही. या लढ्यास भाजप विचारांच्या लोकांचा विरोध आहे. भाजपला दलितांची मते हवी आहेत व ती पैसे आणि प्रलोभनांच्या बदल्यात हवी आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या वास्तू व स्मारकांना आम्ही निधी देतो असे ढोल वाजवून ते मते मागतात व आंबेडकरी जनतेच्या मनात फूट पाडून निवडणुका जिंकतात. आंबेडकरांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांना भाजपने खिशातच ठेवले आहे व अनेक दलित पुढारी स्वार्थासाठी भाजपचे गुलाम झाले. त्यामुळेच महामानव डॉ. आंबेडकर यांचा उघड अपमान करण्याची हिंमत अमित शहा दाखवू शकले. आंबेडकरांचे अनुयायी रामदास आठवले हे तरीही केंद्रातील मंत्रीपदास चिकटून बसणार आहेत काय? अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर भाजपच्या सोयीचेच राजकारण करत राहणार काय? मायावती ईडी, सीबीआयच्या भीतीने भाजपच्या समर्थनासाठी उभ्या राहणार काय? असे अनेक प्रश्न आता लोकांच्या मनात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन आहे असे ज्यांना वाटते अशा ‘मनु’वाद्यांचे राज्य महाराष्ट्रात व देशात आहे. आंबेडकरांच्या अनेक अनुयायांनी मोदी-फडणवीस यांचे राज्य यावे म्हणून प्रतारणा केली. ते आता तरी शहाणे होतील काय? डॉ. आंबेडकरांनी वंचित, पीडितांच्या जीवनातला नरक नष्ट करून त्यांना स्वर्ग दाखवला. आंबेडकर हे देवच आहेत. अमित शहा, देवाचा अपमान का करता?

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment