आम्ही बकरे की वाघ ते जनतेने ठरवलंय:संजय राऊतांच्या ‘बकऱ्या’ला नरेश म्हस्केंकडून ‘गाढवा’ने उत्तर; कवितेतून साधला निशाणा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बकऱ्याचा फोटो पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना डिवचले होते. आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गाढवाचा फोटो अपलोड करत संजय राऊतांना जशास तसे उत्तर दिले. आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेने ठरवले आहे. त्यामुळे गाढवाने गप्प बसावे, अशी खोचक टीका नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली. यावरून राजकारणात एकमेकांवर होत असलेली टीका-टिपण्णी आता एकमेकांना प्राण्यांची उपमा देण्यापर्यंत पोहोचली आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एका बकऱ्याचा फोटो पोस्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याबाबत त्यांना विचारले असता, महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाजवळ उभा असून, त्याला कापण्यासाठी लाकडावर उभे करण्यात आले आहे, असे ते म्हणाले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी गाढवाच्या फोटोसह एका उपहासात्मक कविताही अपलोड केली. या कवितेतून नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या जोरदार हल्ला चढवला. नरेश म्हस्के यांनी पोस्ट केलेली कविता नवाच्या भोंग्याने संरारा
दिली पुन्हा बांग
पुन्हा एकदा नको तिथे
घातलीस बघ टांग मालकाने टाकलेले खाऊन
बें बें रोज सकाळी करायचं
जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं तुमची अक्कल आणि ताकद
दिसली सगळ्यांना निवडणुकात
जनतेने भडकावली ना
सणसणीत थोबाडात? आम्ही बकरे आहोत की वाघ
ते ठरवलंय जनतेने
मला वाटतं, जास्त भेकू नये
गप्प बसावं गाढवाने… संजय राऊत यांची पोस्ट काय होती? संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर एका लाडकावर उभा असलेल्या बकऱ्याचा फोटो पोस्ट केला होता. सोबतच ‘खबर पता चली क्या, ए सं शी गट…’ असे कॅप्शनही त्यांनी दिले होते. पत्रकारांनी त्यांना या पोस्टचा अर्थ विचारला असता ते म्हणाले, तुम्ही सगळेजण पत्रकार आहात. तुम्ही त्या फोटोचा अर्थ काढू शकता. महाराष्ट्रातला एक बकरा आहे. हा बकरा सध्या खाटकाच्या लाकडावर उभा आहे. तुम्ही ते लाकूड पाहिले असेल. गावात, खाटकाच्या दुकानात ते पाहिले असेल. तसे महाराष्ट्रातल्या एका बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला दिल्लीतून सांगितले आहे की, फार शहाणपणा केलास तर मान उडवेन. गप्प उभे राहायचे आणि बे बे करायचे. त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितले आहे. ए सं शी गट म्हणजे काय ते तुम्हाला कळले पाहिजे. त्यांचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीकडे होता असा दावा केला जात आहे.