अमित शहांकडून शिवरायांचा अवमान:एकेरी उल्लेख करणाऱ्या गृहमंत्री शहांवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा- संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शिवरायांचा अवमान करण्यात आला आहे. ते गुजराती आहे म्हणून त्यांना सर्व काही माफ आहे का? आम्ही हे सहन करणार नाही, शिवबांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या गृहमंत्री शहांवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला म्हणून अमित शहा यांचे त्याच्यावर प्रेम आहे का? त्याच्या थडग्याला त्यांनी रायगडावर उभे राहून समाधीचा दर्जा दिला हे एवढं प्रेम?, या लोकांनी आम्हाला छत्रपती शिवराय काय होते हे सांगू नये. संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अमित शहांनी आम्हाला काही सांगावे एवढी वाईट वेळ राज्यावर आली नाही. औरंगजेबाचे थडग उखडून टाकण्याच्या विचाराने भाजपने लोकं भारावून गेले होते. औरंगजेबाची कबर काढून टाकू त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाचे प्रदर्शन केले. त्यातून लोकं पेटले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्या गोष्टीला अमित शहा यांनी समाधीचा दर्जा दिला. औरंगजेबाची समाधी असा उल्लेख त्यांनी रायगडावरुन केला. आता यापेक्षा वाईट महाराष्ट्रात काय होणार? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. .. मग दंगली का घडवल्या? संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला जर औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर इतक्या हाणामारी आणि दंगली का घडवल्या? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? एवढं प्रेम. महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूच्या थडग्याला समाधीच्या दर्जा देण्यासंदर्भात वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाजूला बसलेले असताना करतात. त्यांच्या वंशजांना या गोष्टीचा त्रास व्हायला हवा होता. ..तर देवाभाऊ,शिंदेंनी थयथयाट केला असता संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाची समाधी हा शब्द जर दुसऱ्या कुणाच्या तोंडून निघाला असता तर देवाभाऊ, आणि शिंदे या दोघांनी थयथयाट केला असता. अजित पवार संयमी आहेत. हिंदुत्वाचा कडेलोट झाला असे म्हटले असते पण काल यांच्या तोंडून काही निघाले नाही. अमित शहांनी कालच्या भाषणामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख केला. हा शिवरायांचा अपमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. नकली हिंदुत्ववादी शिंदे गटाचे लोकं कुठे आहे. महायुतीमध्ये एकोपा आहे असे रायगडावरील कार्यक्रमात दिसून आले नाही. शिंदे गटाचे नेते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला नव्हते.