परभणीच्या प्रकरणाचे अमरावतीत पडसाद:भीम ब्रिगेड, आजाद पार्टीचे जिल्हाकचेरीवर आंदोलन
परभणी येथे उफाळलेल्या हिंसाचारासाठी कारणीभूत असलेल्या समाजकंटकावर त्वरेने कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी भीम ब्रिगेड व आजाद समाज पार्टीने आज, गुरुवारी जिल्हाकचेरीसमोर आंदोलन केले. भीम ब्रिगेडने त्या समाजकंटकाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून नारेबाजीही केली. भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, सचिव विक्रम तसरे, शहराध्यक्ष अमीत कुळकर्णी, इतर पदाधिकारी उमेश कांबळे, अविनाश जाधव, ज्ञानेश्वर रंगारी, गौतम सवाई, मनोज चक्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान शिल्पाची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी एका समाजकंटकाने त्या शिल्पाची तोडफोड केली. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही धक्का बसला. या प्रकरणानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे. त्यामुळे संबंधित समाजकंटकास त्वरेने अटक करुन त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक राजेंद्र कटके यांना निवेदनही सोपविण्यात आले. यावेळी सतीश दुर्योधन, बाबाराव धुर्वे, अजय खडसे, केवल हिवराळे, रोशन गवई, विजय खंडारे, विजय मोहोड, धीरज निरगुडे, प्रफुल्ल तंतरपाळे, शुभम राऊत, सोहेल खान, गौतम गवळी आदी उपस्थित होते. आजाद समाज पार्टीची निदर्शने याच मागणीसाठी आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मनीष साठे, प्रदेश प्रवक्ते प्रमोद मेश्राम, सचिव किरण गुडधे, डॉ. बशीर पटेल यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात जिल्हा सचिव रवि हजारे, उपाध्यक्ष लक्ष्मण चाफळकर, युवा आघाडीचे सचिव विनीत डोंगरे, नंदकिशोर काळमेघ, अतुल गायगोले, अशोक इंगोले, अजहर पटेल आदी सहभागी झाले होते.