एकट्या वृद्ध दांपत्यांनी सोबत राहण्यास वसवले नवे गाव:मुले विदेशात स्थायिक, तर केरळच्या कोट्टायमलगत दीड एकरात बनवली 15 घरे, किचनही कॉमन
केरळच्या कोट्टायमपासून सुमारे ३० किमी दूर लालम नदीकिनारी एकाच वेळी १५ घरे बांधली आहेत. ७२४ चौरस फुटांच्या २ खोल्यांच्या या घरांत किचन नाही. प्रत्येक घरात केवळ एक वृद्ध दांपत्य राहते. हे सिनर्जी गाव केरळच्या १५ वृद्ध दांपत्यांनी वसवले आहे. डॉक्टर, अभियंता, बँक व्यवस्थापक, शिक्षक, प्राध्यापक, कर्नल आदी पदांवर काम केलेली ही वृद्ध दांपत्ये त्यांची मुले इतर शहरांत किंवा परदेशात स्थायिक झाल्याने एकटी राहत होती. आता येथे नवे आयुष्य जगत आहेत. त्यांच्यासोबत दिव्य मराठी प्रतिनिधी एक दिवस सोबत राहिली व त्यांचे आयुष्य जाणून घेतले. कॉटेजचा सिद्धांत-स्वत:चे काम स्वत: करा; जे असमर्थ, त्यांना सर्वांनी मदत करावी मी सकाळी १० वाजता सिनर्जी येथे पोहोचले. पहिले घर निवृत्त कर्नल मॅथ्यू मुरिकन व त्यांची पत्नी डॉली मॅथ्यू यांचे आहे. त्यांनी इतर सदस्यांची भेट करून दिली व कॉमन किचनच्या वरील गेस्ट रूममध्ये राहण्याची सोय केली. २ नोव्हेंबर रोजीच याची सुरुवात झाली आहे. सध्या येथे ७ दांपत्ये राहत आहेत. दुपारी १२:३० वाजता जेवण करण्यासाठी आम्ही कॉमन किचनमध्ये गेलो. दोन जण सर्वांसाठी जेवण बनवतात. येथे सर्व जण हसतखेळत काम करत होते व एकमेकांना कथा ऐकवत होते. कुणालाही कोणतीच घाई नव्हती. सर्व तणाव-चिंतेपासून दूर. स्वत:चे जेवण स्वत: घेत भांडीही स्वत:च धुतात. येथे सर्वात वयस्कर दांपत्य ८६ वर्षांचे प्रा. पॉल आणि ८२ वर्षांच्या त्यांच्या पत्नी मेरी पॉल आहेत. प्रत्येक जण त्यांच्या मदतीसाठी तयार राहतो. येथील सिद्धांत असा आहे की, स्वत:चे काम स्वत: करणे व जे असमर्थ आहेत त्यांना मदत करणे. जेवणानंतर सर्व आपल्या कॉटेजमध्ये झोपण्यासाठी गेले. थोड्या वेळानंतर पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजता सर्वजण छत्री घेऊन चहा पिण्यासाठी आले. काही जण स्नॅक्ससोबत चहा पीत गप्पा करत होते. यानंतर मी दीड एकरातील परिसर पाहायला आले. संपूर्ण परिसरात अनेक फळझाडे लावली आहेत. भाज्या पिकवण्याची तयारीही सुरू आहे. येथे तुळस आदी औषधी वनस्पतीही आहेत. सायंकाळी ७:३० वाजता जेवणाची वेळ झाली. कर्नल साहेबांनी सर्वांसाठी अननस, काकडी व कांद्याचा सलाड बनवला. ते म्हणाले, ६ महिन्यांत सिनर्जीचे सर्व सदस्य येथे कायमचे स्थायिक होतील. तेथून परत येत मी आपल्या गेस्ट रूमच्या बाल्कनीत उभी राहून येथील थंड हवेतील शांतता व आनंदाची अनुभूती घेत होते. पुढच्या दिवशी सकाळी साडेसात वाजेपूर्वी नाष्ट्याची वेळ होताच मी माघारी निघाले. मात्र, या सुंदर ठिकाणाच्या आठवणी सोबत घेऊन आले. येथे एक नर्सिंग स्टेशन असून तिथे औषधी व प्राथमिक आरोग्याची संपूर्ण सोय आहे.