अन् पांडुरंगानेच जातीपातीत अडकलेल्या पांडुरंगाला केले मुक्त:समाजहितासाठी लढणारे साने गुरुजी; शेवट मात्र अनपेक्षितच झाला
या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत साने गुरूजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे, असे मत पु. ल. देशपांडे यांनी साने गुरुजी यांच्यासाठी लिहिले होते. श्यामची आईच्याही पलीकडे अनेक पैलू साने गुरुजींचे आहेत. मात्र, फार कमी लोकांना साने गुरुजी पूर्ण माहीत आहेत असे म्हंटले तर आश्चर्य वाटायला नको. लेखक, साहित्यिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, प्राध्यापक, समाजसेवक, लोकशाही समाजवादाचे भाष्यकार आणि आंतरभाती चळवळीचे प्रवर्तक असे अनेक पैलू पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे आहेत. आपल्या लहानपणी शाळेत ‘आता उठवू सारे रान’ किंवा ‘बलसागर भारत होवो’ हे गीत आपण गायलो आहोत. याचे वैशिष्ट्य म्हणजे या गीतांची फक्त पहिली ओळ वाचली की आपसूकच मनात दुसरी ओळ येऊन जाते ती सुद्धा अगदी चालीत. ही ताकद आहे साने गुरुजींच्या लेखणीची. निबंध लेखन स्पर्धा जेव्हा असायची तेव्हा हमखास साने गुरुजींच्या निबंधांमध्ये तो विषय आहे का हे एकदा तरी तपासून बघायचोच. हे व्यक्तिमत्त्वच असे आहे की त्यांचा प्रभाव आजही आपल्यावर कायम आहे. साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी पालगड येथील दापोली येथे झाला. पालगडला त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षण झाल्यावर त्यांनी न्यू पूना कॉलेजमध्ये मराठी आणि संस्कृत साहित्यात त्यांनी एम.ए पदवी मिळवली. कॉलेजच्या दिवसांपासूनच साने गुरुजी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरू केले होते. असहकार आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्यानंतर 1942 च्या लढ्यात त्यांनी भूमिगत राहून क्रांतिकार्य केले. यावेळी त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन केले. या काळात त्यांनी इंगरांच्या विरोधात तसेच लोकांना लढ्यात भाग घेण्यास प्रेरित करण्यासाठी विपुल लेखन केले. साने गुरुजी यांनी कधीच जातिभेद केला नाही. त्याकाळी भारतात असलेल्या जातिभेदाच्या विरोधात गुरुजी होते. तसेच त्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे देखील मोठ्या प्रमाणात काम केले आणि यातूनच ‘खरा तो एकची धर्म’ सारखी प्रार्थना त्यांच्या हातून लिहिली गेली. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे, अशा वाक्यांमधून त्यांनी लोकांना जागृत करण्याचे काम केले. विशेष म्हणजे ही प्रार्थना शाळेत म्हणायला देखील सुरू झाले. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ही प्रार्थना शाळेत म्हंटली जायची. मात्र, त्यांच्या या लेखनाचा आज कितपत परिणाम झाला आहे? कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे, या ओळी आज कालातीत झाल्या आहेत असे म्हणले तर त्यात आश्चर्य वाटू नये. मात्र, साने गुरुजींनी तेव्हापासूनच यावर भाष्य केले होते. केवळ भाष्य नाही तर अगदी प्राण पणाला लाऊन उपोषण केले होते. पांडुरंगानेच पांडुरंगाला मुक्त केले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरीजनांना मोकळे व्हावे, म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली, तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल. या रूपाने महाराष्ट्रातील सर्व जीवनांतील अस्पृश्यता नष्ट व्हावी, दुष्ट रूढीची कुलपे गळून पडावीत. मी माझ्या प्राणांचे तेल घालण्यासाठी उभा आहे.. पंढरपुरात हरिजन समाजाला देखील प्रवेश मिळवा यासाठी साने गुरुजी यांनी 1946-47 या काळात महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यात जाऊन हे भाषण केले. 1946 च्या नोव्हेंबर महिन्यात साने गुरुजी यांनी पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना खुले व्हावे म्हणून प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली होती. 4 नोव्हेंबर 1946 रोजी साने गुरुजी यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. “आज कार्तिकी एकादशी. प्लेग असला तरी पंढरपूरची यात्रा जमेल. विठ्ठलाच्या चरणांचे संतांनी समचरण म्हणून वर्णन केले. ते चरण भेदभाव करत नाहीत. ते सर्वांभूती सम आहेत. परंतु हरिजनांना त्या चरणांवर का बरे डोके ठेवता येऊ नये? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करीत राहीन.” ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि सेनापती बापट व इतर मंडळी तातडीने साने गुरुजींना भेटायला गेले आणि त्यांनी त्यांना पाठिंबा देखील दिला. उपोषण करण्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा करावा असे देखील त्यांना सुचवण्यात आले. महाराष्ट्राची जनता देखील आपल्यासोबत घ्यावी असा ठराव करण्यात आला. महाराष्ट्रभर साने गुरुजी यांनी यात्रा केली. एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच त्यांनी जवळपास 400 सभा घेतल्या असतील. त्यांच्या या लढ्याला सनातनींचा विरोध होता. ‘जाव साने भीमापार, नहीं खुलेंगे विठ्ठलके द्वार’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी बडवे यांच्या अधिपत्याखाली हे मंदिर होते. त्यांनी साने गुरुजी यांना कडाडून विरोध केला होता. साने गुरुजी यांना सत्याग्रहसाठी कोणी जागा देखील देत नव्हते. मात्र, सर्वांचा विरोध पत्करून श्री तनपुरे महाराज मठाने साने गुरुजी यांना जागा दिली. 1 मे 1947 रोजी रोजी साने गुरुजी यांनी उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे साने गुरुजी यांचे गुरु महात्मा गांधी यांनी हे उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. मात्र, साने गुरुजी यांनी त्यांचे देखील ऐकले नाही. राज्यभरातून लाखो तरुण कार्यकर्ते साने गुरुजी यांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले. यात आचार्य अत्रे, मावळंकर यांसारखे मोठे व्यक्तिमत्व देखील होते. या सगळ्यांच्या दबावामुळे बडवे आणि मंदिर प्रशासनाने मंदिर प्रवेशाचा नियम बदलण्याचा निर्णय घेतला. अखेर 10 मे 1947 रोजी साने गुरुजींनी उपोषण थांबवले आणि पुण्याच्या दलित समाजाचे कार्यकर्ते सोनवणकर यांच्या हातून मोसंबीचा ग्लास घेत थरथरत्या हातांनी ते प्यायले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष सुरू केला. अशा पद्धतीने जातीपातीच्या बंधनात अडकलेल्या त्या पांडुरंगाला या पांडुरंगाने मुक्त केले. अन् साने गुरुजींनी प्राणार्पण केले साने गुरुजी 50 वर्ष जगले, यातील शेवटची 25 वर्ष त्यांनी स्वतःला समाजासाठी झोकून देऊन काम केले. असंख्य पुस्तके लिहिली. मात्र त्यांच्या लिखाणातून काहीच साध्या होताना दिसत नव्हते. देश स्वतंत्र झाला मात्र त्यांच्या अपेक्षेनुसार चित्र त्यांना कुठेच बघायला मिळत नव्हते. 1948 च्या जानेवारी महिन्यात महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा साने गुरुजींच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. याबद्दल सांगताना सुधाताई सांगतात, एखादी व्यक्ती गांधीजींची हत्या करूच कशी शकते आणि मराठी व्यक्तीने त्यांची हत्या केली याचे अपार दुःख त्यांना झाले. त्यावेळी त्यांनी 21 दिवसांचे उपोषणही केले होते. देश स्वतंत्र झाल्यावर सर्व देश एक होईल, गट-तट विसारतील, सर्वांना रोजगार मिळेल तसेच सर्वांना अन्न मिळेल अशी आशा साने गुरुजी यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात असे काहीच होताना त्यांना दिसले नाही. याचे देखील त्यांना अतीव दुःख झाले. साने गुरुजी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक आघात सहन केले. आई वडिलांनंतर भाऊ, भावजय आणि पुतण्याचे देखील त्यांना निधन पहावे लागले. 11 जून 1950 रोजी साने गुरुजी यांनी प्राणार्पण केले आणि सर्वांना धक्काच बसला. त्यांनी हा निर्णय का घेतला असेल यावर अद्याप कोणाला काही ठोस असे सांगता आले नाही. 2010 साली ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव यांनी साने गुरुजी यांच्यावरील विशेष अंकात त्यांच्या प्राणार्पणाबद्दल लिहिले आहे. रा. ग. जाधव त्यांच्या साधना या विशेषांकात लिहितात, गुरुजींच्या भावसंस्कृतीप्रधान परिवर्तनवादाला मोठी मूल्यात्मक प्रतिष्ठा प्राप्त झाली, ती त्यांच्या प्राणार्पणाच्या निर्णयाने व कृतीने! गुरुजीप्रणीत भावमूल्यात एक व्यापक मानवतवादी अपराधी जाणिवेचा मौलिक घटक होता. त्यांच्या विचारात व वाङ्मयात केवळ नव्हे, तर आचारातही तो होता. म्हणूनच आपल्या परंपरेने हरिजनांचा केलेला गुन्हा, अपराध मान्य करून त्याचे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी पंढरपूरसाठी प्राणांतिक उपोषण केले. ही अपराधी भावना या भल्या माणसाने दीर्घ काळपर्यंत मनोमन वागवली, सहन केली. पुढे ते लिहितात, गुरुजींच्या प्राणार्पणाच्या निर्णयामागे असेच एक दुखरे अपराधी मानस होते, असे वाटते. ते म्हणजे महात्मा गांधींच्या हत्येचा महापराध. ही अपराधी भावना केवळ एकवीस दिवसांच्या उपोषणाने शमली नाही. ती त्यांच्या देहमनाला पुढील अठ्ठावीस महिने पोखरत राहिली. भावसंस्कृती, भावमूल्य आणि त्यांतील मानवतावादी अपराधी जाणीव अपूर्व, धक्कादायक व शोकात्म परिणती म्हणजे गुरुजींचे प्राणार्पण, अशा शब्दात रा.ग जाधव यांनी त्यांच्या प्राणार्पणाबद्दल लिहिले आहे.