आनंदाची गुढी:पाडव्याच्या मुहूर्तावर पैठण तालुक्यात २८ चारचाकींसह ७३ दुचाकींची विक्री

तालुक्यात मराठी नववर्षाच्या निमित्ताने सोने-चांदी खरेदीच्या तुलनेत वाहन बाजारपेठ सुसाट दिसून आली. पण, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन बाजारपेठेतील खरेदी कमी झाल्याचे वाहन विक्रेते अमोल कुलकर्णी यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पैठण तालुक्यात ७३ दुचाकी व २८ चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ३० टक्क्यांनी कमी आहे. स्थानिक संस्था कर आणि उत्पादन शुल्काचा भार वाढल्याने यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा तुलनेने कमी असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी वस्तू खरेदी शुभ मानली जाते. यामुळे अनेक जण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदी करतात. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या खरेदीला कमी प्रतिसाद असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांनी सांगितले. वाहन खरेदीकडे ग्रामीण भागात असलेल्या नागरिकांचा ओढा यंदा कमी राहिल्याचे दिसून आले. यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी २८ चारचाकी, तर ७३ दुचाकींची विक्री झाली आहे. पैठण तालुक्यात मागील वर्षी ११० मोटारसायकल व २५ चारचाकींची विक्री झाली होती, अशी माहिती वाहन विक्रेते कुलकर्णी यांनी दिली. ईतर तालुक्यांतही नागरिकांनी कमी अधिक- प्रमाणात वाहनांची खरेदी केली. पैठण शहरासह तालुक्यातील बिडकिन, पाचोड या मोठ्या ग्रामीण भागातील बाजारपेठ वाहने विक्री झाली आहेत. पैठण शहरातील बाजारपेठ १६ चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. बिडकीन व पाचोडमध्येही काही चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे.