अनंत अंबानींच्या आध्यात्मिक यात्रेत धीरेंद्र शास्त्रींची सोबत!:जामनगर-द्वारका 12 दिवस 170 किमी चालणार

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आध्यात्मिक यात्रेवर आहेत. २९ मार्च रोजी जामनगरपासून निघालेल्या अनंत यांचे उद्दिष्ट ३० व्या जन्मदिनाच्या एक दिवस आधी द्वारकेला पोहोचणे आहे. त्यासाठी ते दररोज रात्री सुमारे २० किमी पदयात्रा करत आहेत. हे अंतर पूर्ण करण्यासाठी सात तास लागतात. अनंत यांचा जन्मदिन १० एप्रिलला आहे. २९ वर्षीय अनंत या यात्रेदरम्यान हनुमान चालिसा, सुंदरकांड, देवी स्तोत्राचे पठण करतात. अनंत कुशिंग सिंड्रोमने पीडित आहेत. त्यादृष्टीने त्यांची ही पदयात्रा महत्त्वाची ठरते. हा एक दुर्मिळ हार्मोन विकार आहे. यासोबतच ते लठ्ठपणा, दमा आणि फुफ्फुसाच्या आजाराशीही झुंज देत आहेत. आध्यात्मिक आवड असलेले अनंत नियमितपणे बद्रीनाथ, केदारनाथ, कामाख्या, नाथद्वारा, कालीघाटसारख्या धार्मिक स्थळांची यात्रा करतात. अनंत यांच्याकडे जगातील सर्वात मोठ्या रिफायनरीची धुरा आहे. देशातील सर्वात मोठा न्यूएनर्जी प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात आकार घेत आहे. त्यांनी जामनगर वनतारा प्राणिसंग्रहालयाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते.