बाजारपेठेत आवक वाढली; अद्रकाच्या दरात 2 हजारांची घसरण:अद्रकाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; लागवडीचा खर्चही निघेना

घाटनांद्र्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा अद्रकाची लागवड केली. यामुळे सध्या शेतशिवारामध्ये अद्रक काढणीचा हंगाम सुरू आहे. सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी काढणी केलेले अद्रक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आले. यामुळे बाजारपेठेत सध्या अद्रकाची आवक वाढली. याचा मोठा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कारण यामुळे अद्रकाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अद्रकाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पूर्वी अद्रकाला असलेला ४००० रुपयांचा दर आता केवळ दोन हजारांवर आला. यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारीही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून अद्रक या पिकाकडे पाहिले जाते. यामुळे काही शेतकरी लखपती तर काही करोडपती झाले आहेत. परिसरात अद्रक लागवडीला शेतकऱ्यांची मोठी पसंती आहे. असे असताना अद्रकाला या वर्षी सुरुवातीला काही दिवस चार ते साडेचार हजार रुपये भाव होता. मात्र मागील आठ दिवसांपासून अचानक अद्रकाचे भाव गडगडल्याने चार हजारांचा असलेला भाव केवळ दोन हजारांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तर, ज्या व्यापाऱ्यांनी चार ते साडेचार हजार रुपये दराने अद्रक खरेदी करून ठेवले आहे ते आता मार्केटमध्ये विक्रीस नेले असता व्यापारी कमी दराने मागत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्यापारीही सापडले अडचणीत : कोठाळे घाटनांद्रा परिसरात अद्रकाचे व्यापारी असून हे व्यापारी शेतीच्या बांधावर जाऊन अद्रक खरेदी करतात. खरेदी केलेल्या अद्रकाला बाजारपेठेत विक्रीसाठी काही दिवस लागतात ज्या भावाने अद्रक खरेदी केले, पुढे भाव वाढतील की कमी होतील याची काही शाश्वती नसते. भाव कमी झाले की व्यापाऱ्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागतो, असे व्यापारी सुधाकरअप्पा कोठाळे यांनी सांगितले. यामुळे दरात घसरण झाल्याचे समोर आले. लागवडीवरच मोठा खर्च: मोरे अद्रकास गत वर्षीसारखा भाव मिळेल या आशेने मोठमोठी स्वप्ने रंगवली होती. भाव कमी झाल्याने अडचणीत आलो. अद्रक लागवडीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके, औषधांची फवारणी व इतर खर्च पाहता अद्रकामुळे शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागत असल्याचे शेतकरी विलास मोरे म्हणाले.

  

Share