अरुणा फाउंडेशनची महिला कामगारांसाठी कार्यशाळा:कामगार महिलांना हक्कांची जाणीव व सक्षमीकरणाचे प्रशिक्षण

महिला कामगारांना सक्षम, सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हायला हवी. कामगार महिलांच्या जीवनकौशल्य आणि कायदेशीर हक्कांसाठी, त्यांच्या सशक्तीकरणासाठी काम करणारी ‘अरुणा संस्था’ म्हणजे उपेक्षित समुदायातील महिलांसाठी नव्या आशेचा किरण आहे असे मत कवयित्री सरुताई वाघमारे यांनी व्यक्त केले. अरुणा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ‘सक्षमता, सुरक्षितता आणि हक्कांची जाणीव’ या विषयावर एकदिवसीय क्षमतावृद्धी कार्यशाळा झाली. कार्यशाळेत अनेक कष्टकरी महिला कामगार, विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या युवकांनी सहभाग घेतला. अरुणा एज्युकेशन फाउंडेशनच्या अभिधा निफाडे उपस्थित होत्या. यावेळी शासकीय योजना, सामाजिक संरक्षण, आयुष्मान भारत, श्रमिक कार्ड, वृद्धापकाळ पेन्शन, शिष्यवृत्ती यांसारख्या योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. सरुबाई वाघमारे म्हणाल्या, या कष्टकरी, कचरावेचक महिला, स्थलांतरित कामगार यांचे अनेक महत्वाचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. त्यांच्या सामाजिक, कायदेशीर संरक्षणाचा, जीवनकौशल्याचा मुद्दा महत्वाचा आहे. कचरावेचक महिला आणि त्यांच्या पुढील पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात यायचे असेल, योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी काही मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असते. अशावेळी स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर उद्भवणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढायला हवेत. अभिधा निफाडे म्हणाल्या, अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना व पहिल्या पिढीतील युवकांना जर योग्य प्रशिक्षण, जीवनकौशल्य आणि कायदेशीर हक्कांची माहिती मिळाली, तर ती त्यांच्या वैयक्तिक जीवनाला तसेच संपूर्ण समाजाला बदलवू शकते. युवक जेव्हा स्वतःच्या क्षमता ओळखतात, आत्मविश्वास बाळगतात आणि संवाद साधू शकतात, तेव्हा ते स्वतःचेच नव्हे तर इतरांचंही आयुष्य उजळवू शकतात. कामाच्या ठिकाणी सुरक्षा व हक्क, पॉश, पॉस्को व कामगार कायद्याची माहिती त्यांना व्हावी. आत्मभान आणि भावनिक सक्षमता वाढावे. कार्यशाळेत आर्थिक साक्षरता आणि करिअरची तयारी, पैशांचे नियोजन, उद्दिष्ट निर्धारण आणि शिक्षण व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती देण्यात आली. सहभागी महिलांनी त्यांच्या संघर्षमय जीवनाचे अनुभव सांगितले. घरगुती हिंसाचार, कामावरचे शोषण, आणि सामाजिक बहिष्कार अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्या आज त्यांच्या समाजात नेतृत्व करत आहेत. युवकांनी देखील प्रशिक्षणामुळे आलेले परिवर्तन आणि स्वतःच्या जीवनातील बदल शेअर केले.