आशीष शेलार:मुंबई भाजपचे अध्यक्ष; सलग दोनदा भाजप मुंबई अध्यक्ष, विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक
आशीष शेलार हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1972 रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये देखील आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत. शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष देखील आहेत. शेलार हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला. मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचे शिक्षण घेतले आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी देखील घेतली आहे. आशिष शेलार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पार्टी मधूनच केली. पक्षाच्या प्रती त्यांचे समर्पण आणि नेतृत्व कौशल्यामुळे त्यांना पक्षश्रेष्ठींनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या. खार पश्चिम येथील नगरसेवक म्हणून त्यांना राजकारणात ओळख मिळाली होती. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची मुंबईची जबाबदारी देखील देण्यात आली. 2012 मध्ये, आशिष शेलार यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती झाली, 2014 पर्यंत त्यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून काम केलं. त्यानंतर, पक्षश्रेष्ठींनी आशिष शेलारांवर विश्वास टाकत त्यांना 2014 मध्ये विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं. त्यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली आणि 26,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या विजयाची पुनरावृत्ती करून वांद्र्यात आपला दबदबा वाढवला. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही आशिष शेलार यांनी विजय मिळवत हॅट्टट्रीक मारली. सलग दोनदा भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची सलग दोन वेळा पक्षश्रेष्ठींकडून मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या भूमिकेत त्यांनी पक्षाचा अजेंडा मुंबईच्या विकासाच्या गरजांशी जुळवून घेतला आणि मुंबई पक्ष रुजवण्याचं काम केले. यावेळी आशिष शेलारांपुढे सर्वात मोठे आव्हान होते ते शिवसेनेचे. शेलारांनी देखील ते यशस्वीरीत्या पेलल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचे त्यांचे सखोल ज्ञान आणि प्रभावी नेतृत्व यामुळे पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये शेलारांच्या नावाचा आवर्जुन समावेश केला जातो.