अशोक चव्हाणांचा काँग्रेसवर हल्लाबोल:म्हणाले – माझ्या नेतृत्वात 82 जागा आल्या होत्या, बाबांनी 82 च्या 42, पटोलेंनी 42 च्या 16 केल्या
भाजप नेते अशोक चव्हाण यांनी त्यांचा पूर्वीचा पक्ष काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना 82 जागा निवडून आल्या होत्या. माझ्यानंतर पृथ्वीराज बाबा आले. त्यांनी 82 च्या 42 जागा केल्या. आता नाना पटोले यांनी 16 वरच आणल्या, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला. पक्षाची एवढीय दयनीय अवस्था का झाली? याचे काँग्रसने आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया निवडून आल्या आहे. मुलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. साईबाबांच्या आशीर्वादामुळे माझी कन्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या मतांनी निवडून आली. त्यामुळे बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पक्षाची एवढी दयनीय अवस्था का झाली? याचे आत्मपरिक्षण काँग्रेस पक्षाने करावे. मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा निवडून आल्या, पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी 82 च्या 42 केल्या आणि आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 वर आणल्या हा इतिहास आहे, असा टोला नाना पटोलेंना लगावला. काँग्रेसने परिस्थितीचे आकलन करावे, मी इथे त्यांना सल्ला द्यायला आलो नाही, पक्षात जुने जानते नेते आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले. 14 वर्ष वनवास भोगला
अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्या भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले, मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. मी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने 14 वर्ष वनवास भोगला त्यामुळे मला भावना व्यक्त कराव्या लागल्या. पण मला कोणाबद्दल वैयक्तीक आकस नाही. रागाच्या भरात काही बोललो असेल तर ते मनावर घेऊ नये, असेही अशोक चव्हाण म्हणाले.