आश्वासनपूर्ती:क्रिकेटपटू जितेश शर्माकडून गुणवंतांना बक्षीस, रहाटगावच्या प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना 60 हजारांचा रोख पुरस्कार

गणराज्य दिनी भारतीय क्रिकेटपटू यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माने मनपा क्षेत्रातील रहाटगाव येथील प्रगती विद्यालयातील दहावीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार प्रदान करण्याचे घोषित केले होते. जितेश सध्या आरसीबीकडून आयपीएल खेळण्यात व्यस्त असतानाही त्याने प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याचा शब्द पाळत शाळेसोबत त्याच्या कुटुंबाचे असलेले संबंध आणखी घट्ट केले. जितेशच्या चार मावशी प्रगती विद्यालयात शिकल्या. तसेच त्याचे वडील मोहन शर्मा यांचेही या शाळेसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे जितेशने क्रिकेटमध्ये भरारी घेत भारतीय संघात स्थान पटकावल्याने शाळेलाही त्याचा अभिमान आहे. प्रगती विद्यालयाने त्याला गणराज्यदिन कार्यक्रमाला आमंत्रित केले होते. याच कार्यक्रमात शाळेत पहिले पाच क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण रोख पुरस्कार देणार, असे आश्वासन त्याने दिले. त्याचे पालन करताना त्याने स्वत:च्या अनुपस्थितीत वडील मोहन शर्मा यांना पुरस्कार देण्यासाठी पाठवले. मोहन शर्मा यांच्या हस्ते दहावीत ९३.८० टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावणारी अंतरा सुनील राऊत, ९१.४० टक्के मिळवत द्वितीय क्रमांक पटकावणारी अमृता प्रशांत खोडके यांना प्रत्येकी १५ हजारांचा रोख पुरस्कार प्रदान केला. तसेच ९० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवणारा सोहम गोपाल भोजने, ८७.८० टक्के मिळवणारा अमन भिलावे, ८५.४० टक्के मिळवणारा सार्थक यावले यांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख पुरस्कार असा एकूण ६० हजारांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाळेला एक खोली सुद्धा बांधून दिली ^जितेश शर्मा प्रगती विद्यालयाचा विद्यार्थी नसला तरी त्याच्या कुटुंबाचे या विद्यालयाशी स्नेहाचे नाते आहे. त्यामुळे २००७ मध्ये जितेशचे वडील मोहन शर्मा यांनी शाळेत एक खोली बांधून दिली. तसेच ते नेहमीच शाळेला सहकार्य करत असतात. विद्यार्थ्यांसाठी जितेश प्रेरणास्रोत आहे. भारत शहारे, मुख्याध्यापक, प्रगती विद्यालय, रहाटगाव.