औरंगजेबाइतकेच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसले:राजकारण्यांनी त्यांच्या हत्येचा खेळ केला, संजय राऊत यांचा आरोप

औरंगजेबाइतकेच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसले:राजकारण्यांनी त्यांच्या हत्येचा खेळ केला, संजय राऊत यांचा आरोप

पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे, हे दिसत आहे. एका बाजूला छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर हे दाखवता, औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रौर्याने वागला हे दाखवण्यात आले. त्याच संभाजी महाराजांच्या राज्यात तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुख सारख्या एका प्रजेच्या, नागरिकाच्या बाबतीत दिसला, त्याच क्रौर्याने संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा, हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत, असेही ते म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाइतकाच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसले, असे संजय राऊत म्हणालेत. … तर देशमुखांचे प्राण वाचले असते
इतक्या गोष्टी समोर आल्या, संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे मारण्यात आले. नंतर त्यांच्यावर लघवी करण्यात आली, किती पराकोटीचे क्रौर्य या महाराष्ट्रात, बीडमध्ये घडले. हे सर्व लोक मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. मुंडे हे काही कोणी महात्मा नाहीत, हे मिस्टर फडणवीस आणि अजितदादांनाही माहित आहे. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या, दहशत, दाखवून कसे मतदान करू दिले नाही हे निवडणूक आयोगाने, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी देखील पाहिले आहे. त्यांची निवडणूक त्याचवेळी रद्द व्हायला हवी होती, तसे झाले असते तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते, असे खडेबोल संजय राऊत यांनी सुनावले. … तर फडणवीसांनी न्याय केला असे सांगता आले असते
या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पुढील 24 तासांतच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण ते म्हणतात कोर्ट ठरवेल. नैतिकतेच्या मुद्यावर हा राजीनामा त्यांनी घेतला असता, तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असे आम्हाला छातीठोकपणे सांगता आले असते. असे संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत
या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत. मुख्यमंत्री हे कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत. काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, त्याला न्याय म्हणत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्यांनी ताबडतोब मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्त दाखवायला हवा , जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना बाहेर काढायला पाहिजे आणि या राज्यात इतर कोणीही कायद्याचा गैरवापर करू नये, याचीसुद्धा त्यांनी काळजी घ्यायला हवी, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment