ऑटोचालक ते महाराष्ट्र चालक:एकनाथ शिंदे… ठाकरे कुटुंबाला धक्का देत अवघा महाराष्ट्र हादरवून सोडणारा धाडसी राजकारणी
शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार? या कळीच्या प्रश्नाचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मिळत होते. सर्वचजण फडणवीस हे मुख्यमंत्री, तर ठाकरेंना धक्का देणारे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील असा दावा करत होते. पण 30 जून 2022 रोजी राज्याच्या राजकारणाने एक धक्कादायक वळण घेतले. ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते, त्याच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला तर मग मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या मालिकेतील शेवटच्या भागात आज आपण पाहूया ऑटो ड्रायव्हर, आनंद दिघे यांचे मानसपुत्र ते महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वोच्च सत्ताशिखर सर करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास… सुरुवातीला थोडेसे शेवटचे… राजकारण केव्हा, कधी अन् कसे कूस बदलेल? हे कुणीही सांगू शकत नाही. तसेच राजकारणात कोण, कधी अन् कसा यशस्वी होईल? याचे भाकितही कुणी वर्तवू शकत नाही. महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला व्यक्ती ते मुख्यमंत्री व्हाया ऑटोचालक असा थक्क करणारा प्रवास त्यांचा आहे. त्यांच्यावर ठाकरे घराण्याशी गद्दारी केल्याचा शिक्का आहे. पण लोकांत थेट मिसळण्याची वृत्ती व हुशार राजकीय खेळींमुळे त्यांना हा शिक्का पुसण्यात काहीअंशी यश आल्याचा दावा त्यांचे पाठीराखे करतात. हा शिक्का आयुष्यभर त्यांचा पाठलाग करेल. पण राज्याच्या राजकीय पटलावर शिंदे यांचे नाव ठाकरे कुटुंबाला आव्हान देणारा एक धाडसी शिवसैनिक म्हणून कायम घेतले जाईल हे ही तेवढेच खरे आहे. आता पाहू शिंदे कुटुंबाचे ठाण्याला झालेले स्थलांतर एकनाथ संभाजी शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील अहीर येथे झाला. अहीर हे त्यांचे आजोळ, तर दरे हे त्यांचे गाव होते. शिंदेंचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ते ठाण्यात स्थायिक झाले. त्यानंतर हेच ठाणे त्यांची कर्मभूमी ठरली. शिंदेंचे प्राथमिक शिक्षण ठाण्यातीलच महापालिकेच्या एका शाळेत झाले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी ऑटोरिक्षा चालवली. लग्नानंतर ठाण्यातील वागळे औद्योगिक वसाहतीत ते कामगार नेते म्हणून पुढे आले. एकनाथ शिंदे याच काळात 1980 च्या दशकात शिवसेनेत डेरेदाखल झाले. तो काळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावलेला होता. ठाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तरुण मंडळी सेनेच्या झेंड्याखाली गोळा झाली होती. त्यात शिंदेंचाही समावेश होता. दिघे हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यांच्यावर त्यांचा प्रचंड पगडा होता. दोन मुलांचा डोळ्यांदेखत झाला होता मृत्यू प्रत्येक माणसाच्या यशाला एक दुःखाची काळी किनारही असते. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही असेच आहे. 2 जून 2000 ची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे आपला 11 वर्षीय मुलगा दीपेश व 7 वर्षीय मुलगी शुभदा यांच्यासोबत साताऱ्याला गेले होते. तिथे बोटिंग करताना अपघात झाला आणि शिंदेंची दोन्ही मुले त्यांच्या डोळ्यापुढे बुडाले. त्यावेळी शिंदे यांचा तिसरा मुलगा श्रीकांत केवळ 14 वर्षांचा होता. एका मुलाखतीत या दुर्दैवी घटनेची आठवण काढत शिंदे म्हणाले होते, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता. मी पूर्णतः उद्ध्वस्त झालो होतो. मी सर्वकाही सोडण्याचा निर्णय घेतला होता. राजकारणही.’ या घटनेला आज 24 वर्षांहून अधिक वर्षे लोटलीत. शिंदे आपले राजकीय गुरू धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. एवढेच नाही तर त्यांनी थेट ठाकरे कुटुंबाला धक्का देत त्यांच्या शिवसेनेचे सिंहासनही हिसकावून घेण्याची धमक दाखवली. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर मिळाला राजकीय वारसा एकनाथ शिंदे यांच्या उदयाने अनेकांना आश्चर्यचकित केले. आनंद दिघे यांचा 26 ऑगस्ट 2001 रोजी एका अपघातात अचानक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू आजही अनेकजण हत्या असल्याचे मानतात. दिघे हे धर्मवीर नावाने ओळखले जात. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेला ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यासाठी एक चेहरा हवा होता. ठाण्यात शिवसेनेहून दुसरा कोणताही मोठा पक्ष नव्हता. त्यामुळे ठाकरे कुटुंब या महत्त्वाच्या जिल्ह्याला असेच वाऱ्यावर सोडू शकत नव्हते. परिणामी, दिघे यांचे विश्वासू म्हणून त्यांचा वारसा आपसूकच एकनाथ शिंदेंकडे आला. शिंदेंनेही या वारशाचे रोप रोवून त्याचा वटवृक्ष करून दाखवला. सलग 4 वेळा विधानसभेत पोहोचले एकनाथ शिंदे आपले गुरु आनंद दिघे यांच्यासारखेच थेट जनतेत मिसळत होते. त्याचा त्यांना मोठा फायदा झाला. 2004 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी केव्हाच मागे वळून पाहिले नाही. पाहता पाहता त्यांनी ठाण्यात स्वतःचे असे वर्चस्व निर्माण केले की ते तेथील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले. 2009, 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने विजयाचा मुकूट त्यांच्या डोक्यावर चढवला. 2014 मध्ये विरोधी पक्षनेते बनले. मंत्रिपदावर असताना एकनाथ शिंदेंकडे नेहमीच महत्त्वाचे विभाग राहिले. 2014 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये ते पीडब्ल्यूडी मंत्री होते. त्यानंतर 2019 मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व नगर विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्रात सामान्यतः हे विभाग मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न एका साध्या शाखाप्रमुखापासून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पण कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक काम शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले म्हणून काम करतील असा सर्वांचा अंदाज होता. स्थितीही तशीच होती. पण शिंदे यांनी हा अंदाज फोल ठरवला. त्यांनी एकाचवेळी फडणवीस यांच्या धूर्त राजकीय खेळी व स्वतःवरील गद्दारीचा ठसा पुसण्याचे काम करून आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध केले. यासाठी ते थेट लोकांत जाऊन मिसळले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चपखल वापर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा मुद्दाही त्यांनी तेवढ्याच शिताफीने हाताळला. मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केली. त्यानंतर लाखोंचा जनसमुदाय मुंबईच्या दिशेने चालून गेला. यामुळे मुंबईतील जनजिवन विस्कळीत होते की काय? अशी भीती वाटत होती. पण शिंदे यांनी हा लोंढा मुंबईच्या वेशीवरच वाशीत रोखून जरांगे व त्यांच्या समर्थकांना आल्यापावली परत पाठवले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे यांचा हात असल्याचाही आरोप केला जातो. कारण, जरांगे आपल्या भाषणांतून वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, पण शिंदे यांच्यावर अवाक्षरही बोलत नाहीत. उलट तेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात असे त्यांचे कोडकौतुक करतात. त्यामुळे शिंदे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजात आपली प्रतिमा उंचावण्याचा शिताफीने प्रयत्न केला. विशेषतः आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी फडणवीसांना संशयाच्या भोवऱ्यात उभे करून स्वतःची राजकीय परिपक्वताही दाखवून दिली. यामुळे फडणवीसांच्या हातचे बाहुले ठरण्याची शक्यता व्यक्त केले जाणारे एकनाथ शिंदे हे कालांतराने फडणवीसांवरच वरचढ ठरल्याचे स्पष्ट होते. एकनाथ शिंदे सरकारचे काही ठळक निर्णय एकनाथ शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. तसेच 100 कोटींच्या खर्चासही मान्यता दिली. एवढेच नाही तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णयही त्यांच्या सरकारने घेतला. अहमदनगर जिल्ह्यालाही अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणाही महायुती सरकारने केली. एकनाथ शिंदे सरकारने नागरिकांची निवेदने व पत्रांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी मंत्रालयात सेंट्रल रजिस्ट्री सुरू केली. ई ऑफिसवर भर दिला. यामुळे प्रशासकीय कामकाजाला वेग मिळाला. त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणाऱ्या शासन आपल्या दारी उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या प्रकरणी त्यांनी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत रोजगार मेळावे घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सरकारने ही योजना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सुरू केली. पण यामुळे राज्यातील लाखो गरीब महिलांना थेट लाभ मिळाला. या योजनेमुळे महायुती सरकारला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचावण्यात मदत झाली. त्यामुळे ही योजना महायुती सरकारसाठी ‘मत’लाभदायी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षण शिंदे सरकारने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना थेट लाभ मिळेल. पर्यायाने यामु्ळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळेल. सद्यस्थितीत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण केवळ 36 टक्के आहे. या योजनेमुळे हा टक्का वाढण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या या योजनेची जनमाणसांत चर्चा झाली. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे सरकारने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्क्यांची सूट दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासात 100 टक्के सूट देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा गावखेड्यातील गोरगरिबांना थेट लाभ झाला. वाढत्या महागाईत त्यांचा प्रवास खर्च कमी झाला. सरकारच्या या निर्णयामुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पर्यायाने डबघाईला आलेल्या एसटी महामंडळालाही हातभार लागण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनाही त्यांना मिळाली. यामुळे ठाकरेंविना शिवसेनेचे भविष्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अनेकांनी ठाकरेंशिवाय सेनेला भविष्य नसल्याचा दावा केला. राज्यात तसे वातावरणही तयार झाले. पण एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची सर्वत्र हाराकिरी होत असताना त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या 15 पैकी 7 जागा निवडून आणून दाखवल्या. एकनाथ शिंदेंनी समाजकारण, अर्थकारण अन् सत्ताकारण या तिन्ही गोष्टींची सांगड घातली. त्याचा त्यांना लाभ मिळाला. ‘स्ट्राईक रेट’मध्ये ठाकरेंवर मात केल्याचा दावा शिवसेनेतील बंडखोरीनंतर लोकसभा निवडणुकीतील ठाकरे व शिंदे यांच्यातील लढाईकडे अवघ्या राज्यातील लक्ष लागले होते. या दोन्ही गटांचे शिलेदार 13 जागांवर एकमेकांपुढे उभे टाकले होते. त्यातील 7 जागा एकनाथ शिंदे यांनी आपल्या खिशात घातल्या. विशेष म्हणजे या 7 पैकी काही जागा ठाकरे यांच्या हक्काच्या समजल्या जात होत्या. पण छत्रपती संभाजीनगर व ठाण्यासारख्या मतदारसंघांत ठाकरेंच्या उमेदवारांचा हजारोंच्या मताधिक्याने पराभव झाला. त्यामु्ळे या जागांवरील विजय एकनाथ शिंदे यांना बळ देणारा ठरला आहे. त्यांचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला. सकारात्मक राजकारणातून प्रतिमा निर्मिती मी तुमचा माणूस आहे. आता तुमच्या हक्काचा माणूस मंत्रालयात बसला आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला न्याय देण्याचे काम मी करेन, अशा आश्वासक शब्दांतून एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील गद्दारीचा कथित शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा लाभ त्यांना लोकसभा निवडणुकीतही झाला. थेट लोकांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री म्हणून ते राज्यात लोकप्रिय झाले. एकनाथ शिंदे यांचे ऐतिहासिक बंड शिवसेनेत 20 जून 2022 रोजी ऐतिहासिक बंड झाले. एकनाथ शिंदे विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर अचानक नॉट रिचेबल झाले. विधानभवनातून ते थेट गुजरातच्या सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटी व गोव्यापर्यंत अनेक झाडी, डोंगर व हॉटेल तुडवत ते महाराष्ट्रात परतले. त्यांनी 30 जून 2022 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिवसेनेतील बंडखोरीच्या या ऐतिहासिक नाट्याच्या पहिल्या अंकावर पडदा पडला. कालानंतराने शिंदे यांनी शिवसेनाही आपल्या ताब्यात घेतली. बंड यशस्वी झाले नसते तर शिंदे आत्महत्या करणार होते? एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही दिवसांनी त्यांचे विश्वासू मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले होते, ‘एकनाथ शिंदे मला एकदा म्हणाले होते, माझा उठाव यशस्वी होणार की नाही हे सांगता येत नाही. पण तो यशस्वी झाला नाही तर मी माझ्यासोबत आलेल्या सर्वच आमदारांना परत पाठवून दिले असते, मी त्यांना (ठाकरे) फोन केला असता, त्यांना म्हणालो असतो, जे काही घडले ती माझी चूक होती, या लोकांची कोणतीही चूक नाही. आणि मी तिथेच माझ्या डोक्यात घालून घेतली असती.’ एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या वर्षपूर्तीनिमित्त केसरकर यांनी ही आठवण सांगितली होती. त्याची बरीच चर्चा झाली होती. बंडखोरीमागे श्रीकांत शिंदे अन् फडणवीसांचा हात एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी आपल्या मुलालाही मैदानात उतरवले. व्यवसायाने डॉक्टर असणारे श्रीकांत शिंदे यांना त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आणले. काही विश्लेषक एकनाथ शिदे यांच्या बंडखोरीमागे श्रीकांत यांचाही हात असल्याचाही आरोप करतात. श्रीकांत यांनीही त्यांच्या राजकारणचे भाजपसोबतच उज्ज्वल भविष्य असल्याचे विधान करून तसे संकेत दिले होते. दुसरीकडे, भाजपनेही विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांना नेहमीच आतून बळ दिले. कारण उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी करण्यासाठी शिंदे हेच सर्वात मजबूत साखळी असल्याचे फडणवीस यांना ठावूक होते. यासाठी भाजपने अनेकवेळा उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना साईडलाईन करत असल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर शिवसेनेत त्यांना कोणतेही महत्त्व नसल्याची जाणिवही त्यांनी शिंदे यांना वारंवार करवून दिली. यातूनच शिंदे हे ठाकरेंवर नाराज असल्याचे वातावरण तयार झाले. यामुळे उद्धव ठाकरेंनीही त्यांच्यापासून अंतर राखले. शिवसेनेत वर्चस्व सिद्ध करण्यात यशस्वी ठाणे जिल्ह्यातून स्वतःच्या राजकारणाचा प्रवास सुरू करणाऱ्या एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे मेसेंजर अर्थात दूत म्हणून ओळखले जात होते. राज्यातील एखाद्या जिल्ह्यात एखादे राजकीय संकट उद्भवले तर शिंदेच ते सोडवण्यासाठी जात होते. ते कोविड काळात प्रकर्षाने दिसून आले. या काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण ते क्वचित वेळाच नेत्यांशी भेट होते. त्यांच्या जागी शिंदे आमदारांना सातत्याने भेटत होते. त्यांच्या अडचणी सोडवत होते. यातून त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचा विश्वास जिंकला व त्यांना उठाव करण्यासाठी तयार केले. शिंदे निर्णायक घाव घालतील हे कुणालाच वाटले नाही उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नजर ठेवण्यासोबतच त्यांचे पख छाटण्याचाही प्रयत्न सुरू केला. त्यांच्या खात्याचे निर्णय परस्पर होऊ लागले. त्यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवले जात होते. हे सर्वकाही एकनाथ शिंदे यांनी संयमाने पचवले. त्यावेळी ते उद्धव ठाकरे यांच्यावर निर्णायक घाव घालतील अशी कोणतीही कल्पना कुणाच्याही डोक्यात आली नाही. पण 2022 चा जून महिना उजाडला आणि सर्वकाही बदलले. महाविकास आघाडीचे नेते विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यात व्यस्त होते. पण त्यातही एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यात आले. शिंदेंच्या मनात काय? हे कुणालाच समजले नाही मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आपल्या समर्थक आमदारांची भली मोठी मोट बांधली होती. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची हाराकिरी झाली आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सातारी हिसका दाखवला. ते आपल्या समर्थक आमदारांना घेऊन थेट गुजरातच्या सूरतला पोहोचले. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील नेमके स्थान काय? याचा कोणत्याही राजकीय पंडितांना अंदाज आला नव्हता. बंडानंतरचे हे 4 दिवस हे पंडित केवळ हवेत अंदाज बांधत राहिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. पुढे काय? निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे नाव दिले आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. पण यावरील अंतिम निर्णय अद्याप आला नाही. या प्रकरणी पुढील काही दिवसांत सुनावणी होऊन अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. पण तो केव्हा येईल? याचे प्रश्नाचे उत्तर कुणालाही माहिती नाही. तूर्त महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा येत्या 23 तारखेला निकाल येणार आहे. त्यातच एकप्रकारे खरी शिवसेना कुणाची? याचा फैसला होणार आहे. जाता – जाता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिव्य मराठीने महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या कार्याचा आढावा घेतला. याद्वारे या नेत्यांनी राज्याच्या विकासाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा ‘सकारात्मक’ उहापोह केला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील, प्रशासनाला विसर पडलेले दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या सर्वांनी आपापल्या काळात राज्याच्या विकासात भर टाकून महाराष्ट्राचा राज्यशकट हाकण्याचा प्रयत्न केला. आता खाली वाचा ‘मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ या मालिकेतील सर्व खास स्टोरीज एका क्लिकवर… संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण:निष्ठेमुळे पंतप्रधान पदाची संधीही गमावली पेपर विकणाऱ्या माणसाने केले महाराष्ट्राचे सारथ्य:हातात झाडू घेऊन स्वतः रस्त्यावर उतरला होता आपला दुसरा मुख्यमंत्री सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद सांभाळणारे वसंतराव नाईक:कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शनिवारवाड्यासमोर फाशी घेण्याची शपथ घेतली गोदाकाठचा राजयोगी शंकरराव चव्हाण:महाराष्ट्राला सिंचनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारा कडक शिस्तीचा हेडमास्तर विधवेशी दुसरे लग्न करणारे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील:देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत लागली होती इंग्रजांची गोळी बंडखोरी करून पहिल्यांदा बनले मुख्यमंत्री, 4 वेळा CM:शरद पवार यांची 5 हून अधिक दशकांची कारकीर्द; इतरांना बेसावध ठेवून राजकारणात नेहमीच ठरले सरस ब्रिटीश पंतप्रधानांना आव्हान देणारा मुख्यमंत्री:बॅरिस्टर अंतुले… शेतकरी कर्जमाफीसाठी RBI ला भिडले; संजय गांधी निराधार योजनेचे जनक ते मुख्यमंत्री होणे हा चमत्कारच:कुणाच्याही ध्यानी-मनी नसताना CM बनले होते बाबासाहेब भोसले, वाचा रंजक किस्से अवघे 282 दिवस राहिले CM:MBBS परीक्षेत मुलीचे 2 मार्क वाढवल्याचा आरोपामुळे शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी सोडले होते मुख्यमंत्रिपद मुंबईतील माफियाराज संपवणारे मुख्यमंत्री:जाणून घ्या, सरपंच ते राज्यपाल पदापर्यंतचा सुधाकरराव नाईक यांचा प्रवास! शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी:रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री म्हणून टीका; नगरसेवक ते लोकसभा अध्यक्ष पर्यंतचा प्रवास आक्रमक मराठा चेहरा म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले:पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच; वाचा त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून निलंबित होऊनही CM बनले विलासराव देशमुख:सरपंच ते मुख्यमंत्री असा प्रवास; म्हणाले होते-रक्तातली काँग्रेस कशी काढणार? कोर्टातील शिपाई ते देशाचे गृहमंत्री:पहिले दलित CM, शरद पवारांमुळे राजकारणात एन्ट्री अन् त्यांच्याच विरोधात बंड अशोक चव्हाणांकडे CM पद आले तसे गेले:त्यांचा ‘आदर्श’ काँग्रेसला पडला महागात; आता नव्या पिढीसाठी नव्या वाटेवर काँग्रेसची प्रतिमा खराब असताना पृथ्वीराज चव्हाणांवर मुख्यमंत्री पदाची धुरा:गांधी घराण्याशी निष्ठा आणि मराठा वादातीत चेहरा ठरले कारण देवेंद्र फडणवीस ठरले 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री:सर्वात कमी काळाचा विक्रमही त्यांच्याच नावावर उद्धव ठाकरे संयमी, पण खंबीर राजकारणी:दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या विखारी राजकारणात स्वतःला सिद्ध करणारा मुख्यमंत्री