अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या लाकडांसह टेम्पो पकडला:कळमनुरी शिवारात वन विभागाची कारवाई

कळमनुरी शिवारात अवैधरित्या लाकूड तोड करून वाहतूक करणारा टेम्पो लाकडासह वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. 2 सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पकडला आहे. या प्रकरणी वन विभागाकडून पुढील कारवाई केली जात आहे. मागील आठवड्यातील ही तिसरी कारवाई असून यामुळे अवैध वाहतूक तोडीवर लगाम बसणार आहे. हिंगोली जिल्हयात वन विभागाच्या आखत्यारीत असलेल्या जमीनीवरून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वृक्षतोड करून त्याची वाहतूक केल्या जात असल्याच्या तक्रारी होत्या. यामध्ये प्रामुख्याने सागवानासह इतर लाकडांचा समावेश आहे. त्यानंतर विभागीय वन अधिकारी डॉ.राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांनी वन परिक्षेत्रांतर्गत कारवाईसाठी भरारी पथकासह स्थानिक अधिकाऱ्यांची पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, कळमनुरी शिवारातून एका टेम्पो मधून अवैधरित्या लाकूडतोड करून वाहतूक केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागीय वन अधिकारी डॉ. नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, कर्मचारी काळे, काशीदे यांच्यासह पथकाने आज सकाळ पासून हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी बायपास जवळ वाहन तपासणी मोहिम सुरु केली होती. यावेळी एका टेम्पोची (एमएच-04-सीपी-6112) तपासणी केली असता त्यात अवैधरित्या लाकूड तोड करून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. यावेळी चालकाकडे चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने लाकूड व टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने पुढील कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात हि तिसरी कारवाई असून यामुळे अवैधरित्या लाकुडतोड करून वाहतूकीवर लगाम बसणार असल्याचे चित्र आहे.

  

Share