बाबाजी भक्तपरिवाराचे पुणतांब्यात श्रमदान:उपक्रमात 1 हजार 500 भाविकांचा सहभाग

जय बाबाजी भक्तपरिवाराच्या वतीने श्रमेव जयते या उपक्रमांतर्गत पुणतांबा येथील गोदावरी काठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चारशे वर्षांपूर्वी बांधलेला घाट व येथील पुरातन विविध मंदिर परिसरात दिवसभर श्रमदान केले. यात जय बाबाजी भक्तपरिवारातील दीड हजार महिला आणि पुरुष भाविकांनी सहभाग घेऊन पुरातन मंदिरे, घाट दुरुस्ती व स्वच्छा केली. श्रमदान शिबिरामुळे श्रीक्षेत्र पुणतांबेचे रुपडे पूर्णपणे बदलले आहे. राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पुण्यभूमी श्रीक्षेत्र पुणतांबा गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधलेला सुंदर घाट व अडीचशे वर्ष पुरातन मंदिरासह बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथे आहेत. अनेक मंदिरांची येथे पडझड झालेली आहे. दोन महिन्यांपूर्वी येथील दोन मूर्तीच्या विटंबना प्रकरणानंतर जगदगुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांनी येथे भेट दिली. येथील दयनीय परिस्थिती पाहता त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून येथील कार्य करण्याचे निश्चित केले. त्यानुसार नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, जालना यांसह विविध जिल्ह्यातून आलेल्या दीड हजार महिला व पुरुष भाविकांच्या व अनेक कारागिरांच्या सहभागातून पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभर एकदिवसीय महाश्रमदान करण्यात आले. रविवारी पहाटे जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून महाश्रमदानाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. गोदावरी नदी काठावरील दोन्ही घाट व अनेक मंदिराची दुरुस्ती व स्वच्छता यावेळी करण्यात आली. या मोहिमेत जय बाबाजी भक्त परिवाराच्या भाविकांसह पुणतांबेकरांनी मोठे योगदान दिले. या एकदिवसीय महाश्रमदान शिबिरामुळे दक्षिण काशीतील मंदिरांनी कात टाकली असून सर्व मंदिरांचे रुपडे पूर्णपणे बदलले आहे. मंदिरे आकर्षक झाली असून, यामुळे भाविकांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. एकजुटीने राबवलेल्या या मोहिमेतून किती बदल होऊ शकतो हे दक्षिण काशीचे बदललेले स्वरूप पाहून लक्षात येते. निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांच्या या श्रमदान मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.