बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या:नारायण राणे यांचे विधान; उद्धव हिंदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाल्याचा आरोप
बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट गोळ्या घातल्या असत्या, असा दावा माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले होते. त्यांचे हे कृत्य पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना गोळ्या घातल्या असत्या, असे ते म्हणाले. नारायण राणे यांनी शुक्रवारी आपले सुपुत्र नीलेश राणे यांच्यासाठी कुडाळमध्ये सभा घेतली. या सभेद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 25 हून जास्त उमेदवार निवडून येणार नाहीत. कारण, त्यांची भाषा सुसंस्कृत नाही. ते शिवीगाळ करतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभणारी नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा एखादा कार्यकर्ता नावारुपाला येत असेल, तर उद्धव ठाकरे त्याला कमकूवत करण्याचा प्रयत्न करतात. यासंबंधी माझ्यासह अनेकांचे उदाहरण देता येईल. उद्धव हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केवळ 2 दिवस मंत्रालयात गेले. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी मला मुख्यमंत्री करण्याचा धोशा लावला आहे. कोण देईल यांना सत्ता? उद्धव हिंदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी त्यांचे हे कृत्य पाहून त्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या. नारायण राणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार 84 वर्षांचे झालेत. त्यानंतरही त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास दिसत नाही. त्यांनी माझ्या दोन्ही मुलांवर संस्कार नसल्याची टीका केली. पण माझी दोन्ही मुले सुसंस्कृत आहेत. मी स्वतः पवारांची कुंडली काढली. आम्ही गत अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत. पवारही तब्बल 4 वेळा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांनी विकास व मराठा आरक्षणावर बोलू नये. यासाठी त्यांनी कोणतेही काम केले नाही, असे ते म्हणाले. ठाकरेंच्या आमदारांची ठेकेदारीत भागिदारी नीलेश राणे यांनी यावेळी मतदारांना आपल्यावर राग न काढता निवडून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मला ठेकेदारीसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी आमदार व्हायचे आहे. आम्ही सरकारच्या पैशाला केव्हाही हात लावला नाही. त्यामुळे अधिकारी आमचे ऐकतात. पण आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव नाईक यांची ठेकेदारीत भागिदारी असल्यामुळे अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत. वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे कोळी बांधव आम्हाला मतदान करतील. शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात जाऊन सोडवायचे असतात. केवळ ट्रॅक्टर चालवण्याचे फोट काढून त्यांच्या समस्या सुटत नाहीत. आमदार आला की समोरचा अधिकारी उठला पाहिजे असा आमदार असला पाहिजे. राज्यातील 288 आमदारांत आपल्या आमदाराचा ठळक ठसा उमटला पाहिजे. त्यामुळे माझ्यावर कुणीही राग काढू नका. मला निवडून द्या, असे ते म्हणाले.