बीड जिल्हा खंडणी खोरांसाठी अड्डा बनला का?:खंडणीचा आणखी एक प्रकार समोर; माजी सरपांचाविरोधात महिला सरपंचाची तक्रार
बीड जिल्ह्यातील खंडणीची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. त्यातच आता आंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाकडे त्याच गावातील माजी सरपंचाने एक लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खंडणी हा गोरखधंदा झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यांमध्ये ममदापुर पाटोदा ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच आहेत. या महिला सरपंचाकडे गावातीलच माजी सरपंच यांनी एक लाखाची खंडणी मागितली होती. या संदर्भात सरपंच मंगला राम मामडगे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनंतर माजी सरपंच तसेच एक सदस्य आणि उपसरपंचांचे पती यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच पदावर देखील महिला आहेत. मात्र, आरोपी विविध कारणे सांगून विकास कामांमध्ये सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होते. तसेच काही खोट्या तक्रारी देखील त्यांनी दाखल केल्या होत्या. या दरम्यान दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी या आरोपींनी सरपंचाकडे केली होती. त्यामुळे अखेर सरपंचांनी या विरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुख यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्हा खंडणी खोरांसाठी अड्डा बनला आहे का? बीड जिल्ह्यामध्ये खंडणीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. वाल्मीक कराड याला देखील खंडणी प्रकरणांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील खंडणी प्रकरणामधूनच झाली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे बीड जिल्हा खंडणी खोरांसाठी अड्डा बनला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात असलेल्या सर्व आरोपींना खंडणी मागितल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने वतीने ‘मकोका’ लावण्यात आला आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात बीड जिल्ह्यात आता संघटित गुन्हेगारी झाली असल्याचे दिसून येत आहे. कालच घडला होता गोळीबाराचा प्रकार बीडच्या अंबाजोगाईत गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना कालच घडली होती. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अगोदरच पोलिस प्रशासनाच्या अब्रुची लक्तरे निघाली आहेत. त्यातच ही घटना घडल्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली जात आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आपला तपास सुरू केला आहे. यासंबंधीच्या प्राथमिक माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील माऊली नगरमध्ये शुक्रवारी दुपारी हा गोळीबार झाला. त्यात गणेश पंडित चव्हाण (रा. गोविंद नगर, ता. रेणापूर) नामक आरोपीने सिद्धेश्वर नवनाथ कदम यांच्यावर गोळीबार केला.