बीडच्या मक्का मशिदीत जिलेटिनचा स्फोट:वैयक्तिक भांडणातून घडलेली घटना, आमदार सुरेश धस यांची सारवासारव

बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री संदल मिरवणुकीत झालेल्या भांडणाच्या रागातून दोन संशयितांनी गावातील मक्का मशिदीत जिलेटिनचा स्फोट घडवला. रविवारी पहाटे 3 वाजता बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला बोलताना आमदार सुरेश धस यांनी या स्फोटावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, तो जो गव्हाणे नावाचा पोरगा आहे त्याचा कुटुंबाशी जास्त देणे घेणे नाही आणि तो जास्त प्रमाणात दारूच्या आहारी गेला आहे. दूसरा जो आहे सागडे तो सुद्धा फूल ड्रिंकर आयटम आहे. हा पूर्वी जिलेटिनच्या ट्रॅक्टरवर कामाला होता फार पूर्वीच्या कालावधीत. त्याच्याकडे कदाचित जिलेटिन शिल्लक असतील ते आणले आणि वैयक्तिक भांडणातून झालेले हे कृत्य आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. तसेच हे सगळ्यांनीच सोडून दिले पाहिजे, असेही धस पुढे म्हणाले. दरम्यान, या घटनेवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने एखादा गुन्हा करण्याचा विचार जरी केला तरी त्यावर कड कारवाई केली जाते. मात्र, बीडमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. अशावेळी राज्य सरकारचा बुलडोझर पंक्चर झाला का? असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणी काठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी अबू आझमी यांनी केली आहे. अबू आझमी म्हणाले, जेव्हा मंत्री आणि मुख्यमंत्रीही दररोज मुस्लिमांविरुद्ध बोलतील, तेव्हा सामान्य माणसात मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण होईल आणि हे त्याचेच परिणाम आहे. बीडमध्ये एका व्यक्तीने म्हटले – तिथे मशीद कशी बांधली गेली? जर ती हटवली नाही तर मी ती उद्ध्वस्त करेन, आणि नंतर त्या व्यक्तीने मशिदीवर बॉम्ब फेकला आणि त्याच्यावर अतिशय सौम्य कलमे लावण्यात आली. मी अशी मागणी करतो की, दहशतवादी प्रकरणांमध्ये लावण्यात येणारे सर्वात कठोर कलम त्याच्यावर लावण्यात यावेत. एनआयए आणि एटीएसने चौकशी करावी. जर कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तिने असे कृत्य केले असते तर बुलडोझर कारवाई खूप लवकर केली गेली असती. परंतु मला वाटते की या प्रकरणात बुलडोझर पंक्चर झाला आहे. या देशात काय चालले आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.