बीडची ऋचा कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात मिळवले मोठे यश:न्यायाधीश परीक्षेत आली राज्यातून पहिली, पालकांच्या कष्टाचे केले चीज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि जेएमएफसी द्वारे घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत बीड जिल्ह्यातील ऋचा विठ्ठल कुलकर्णी हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. ऋचाने तिच्या पालकांच्या कष्टाचे चीज केले असून पालकांनाही मुलीचे यश पाहून आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ऋचाचे वडील हे पिग्मी एजंट म्हणून काम करतात, तर आई अंगणवाडीमध्ये शिक्षिका आहे. दोघांनी कष्टाने आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण केले. ऋचाने देखील आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत हालाखीच्या व कष्टाने मुलीचे शिक्षण पूर्ण केले आणि मुलीने त्याचे चीज करत यश मिळवल्याने वडील विठ्ठल कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात प्रथम आल्यानंतर ऋचाने आपल्या भावना व्यक्त केल्या. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ऋचा म्हणाली, वडील पिग्मी एजंट असून आई अंगणवाडी शिक्षिका होती, तिने 2019 मध्ये ती सोडली होती. आई वडिलांची खूप मेहनत आहे यामध्ये, माझी मेहनत म्हणजेच अभ्यास 10 टक्के असून आई वडिलांचे श्रम आणि गुरुजनांचे आशीर्वाद 90 टक्के आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वडील पिग्मी एजंट आहेत, त्यांना 100 रुपयांना 2 रुपये कमिशन मिळते, त्यातून 15 हजार रुपयांचा खर्च भागवणे अवघड होते. वडील दोन ड्रेसवर राहिले पण आमच्या गरजा पुरवत राहिले, आईची पण तशीच मेहनत आहे, असे ऋचाने सांगितले. मुलीच्या आयुष्यातील शेवटचे ध्येय असत नाही पुढे बोलताना ऋचा कुलकर्णी म्हणाली, आई वडिलांच्या श्रमामुळे इथपर्यंत पोहोचले आहे, मुलींना शिक्षण देणे महत्त्वाचे असते. लग्न हे मुलीच्या आयुष्यातील शेवटचे ध्येय असत नाही. शिक्षण झाले की मुलीचे लग्न करायचे हा विचार बदलणे गरजेचे आहे. पदवी झाली तिचे लग्न करणे हा विचार बदलावा. पदवी झाल्यानंतर मुलगी तिच्या पायावर उभी राहिल्यास आपण महिला सशक्तीकरणाकडे जातो हे समजणे महत्त्वाचे आहे. लेकराने कष्टाचे चीज केले – ऋचाचे वडील मुलीच्या यशावर बोलताना भावुक झालेले ऋचाचे वडील विठ्ठल कुलकर्णी म्हणाले, बीडच्या लोकांनी खूप सहकार्य केले. बीडच्या लोकांचे उपकार आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे. गेल्या 35 वर्षांपासून पिग्मी एजंट म्हणून काम केले. एक रुपयाची फसवणूक केली नाही. बीड शहरातील सगळ्या लोकांनी सहकार्य केले, यामुळे इथपर्यंत पोहोचलो. लेकराने कष्टाचे चीज केले, याचा आनंद वाटतो. दरम्यान, कोरोना मुळे कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2022 ची परीक्षा लांबणीवर पडली होती कोरोना नंतर 9 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण परीक्षा झाली होती. 24 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यातील 343 उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाली, 17 ते 29 मार्च या काळात मुलाखती पार पडल्या. परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून 114 जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या 10 टोपर्समध्ये 9 मुलीच पहिल्या दहा टॉपर्स मध्ये नऊ मुली असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळवले. सायली संपत झांबरे हिने द्वितीय तर किरण संभाजी मुळीक हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर शिवानी रामनाथ फाडोळ, तन्वी रहमान शेख, सोनिया अविनाश गंडले, तनुजा रमेश कुसारे, सुवर्णा विनायक शास्त्री, वंदना अरविंद चामले, किरण शांताप्रसाद वर्मा, विपुल एकनाथ गुंजाळ, अनिकेत लिंबाराव कोकरे आदींची निवड झाली आहे.