बीडमधील मराठा मेळाव्यात मनोज जरांगे यांना भाषणानंतर भोवळ:खासगी रुग्णालयात दाखल; डॉक्टर प्रकृतीवर नजर ठेवून

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी अचानक बिघडली होती. बीडमधील मराठा प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मेळाव्यात भाषण करताना त्यांना अशक्तपणा जाणवला. त्यांनी व्यासपीठावर बसूनच 45 मिनिटे भाषण केले. भाषण संपल्यानंतर ते भावुक झाले. डोळ्यांत अश्रू आले. त्यानंतर त्यांना भोवळ आली. उपस्थितांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. नंतर जरांगे पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती बीड येथे मराठा मेळाव्या निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना बीड येथील हॉस्पिटल दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृती बद्दल डॉ. सुनील बोबडे व डॉ. अजित घोडके यांनी माहिती दिली. प्रकृती स्थिर असून 24 तास निगराणी खाली ठेवले मनोज जरांगे पाटील यांना कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मळमळ होत होती. त्यांना चक्कर देखील येत होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी केल्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. त्यांचा रक्तदाब 100 वर आला होता. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या रक्ताच्या देखील सर्व चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे. आता त्यांचे प्रकृती स्थिर असून त्यांना 24 तास निगराणी खाली ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.