भारती विद्यापीठात बॉम्ब असल्याच्या ईमेलने खळबळ:पोलिस, बीडीडीएस तपासणी नंतर अफवा असल्याचे स्पष्ट
पुणे शहरातील कात्रज परिसरात असलेल्या भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल कॉलेज प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिल्यावर पोलिस बीडीडीएस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन महाविद्यालय, हॉस्टेल खाली करुन सखोल तपासणी करण्यात आली. परंतु त्यानंतर सदर बाब अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, याप्रकरणी संबंधित अनोळखी ईमेल धारका विराधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कॉलेजच्यावतीने डॉ.मंदार दत्तात्र्य करमरकर (वय-५५, रा.पर्वती दर्शन, पुणे) यांनी पोलिसांकडे अज्ञात ईमेल धारका विराधात तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांना एका अलोळखी व्यक्तीने संबंधीत इर्मल पाठवला होता. त्यामध्ये तमिळनाडूमधील एका घटनेचा उल्लेख करुन भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची चेतावणी देण्यात आली. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले. बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सर्व ठिकाणी तपासणी करत वस्तीगृहाची देखील झाडाझडती घेतली. याप्रकारामुळे महाविद्यालयात खळबळ उडून धावपळ झाली. पोलिसांनी ईमेलची तपासणी केली असता तो विदेशातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ईमेल मध्ये कोणती स्पष्ट धमकी नव्हती किंवा ईमेल करणाऱ्याचा उद्देश स्पष्ट कण्यात आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.