भाटेगाव शिवारात टेम्पो उलटून एक जण ठार, एक गंभीर जखमी:चालकास उपचारासाठी नांदेडलला हलविले

आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भरधाव टेम्पो उलटून झालेल्या अपघातात क्लिनर ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ता. 6 दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेडकडून एक टेम्पो (क्र.एमएच-24एयु-8360) रेशमी धाग्यांचे बंडल घेऊन विदर्भाकडे निघाला होता. सदर टेम्पोवर चालक म्हणून दामानंद दादाराव रायभोळे (रा. लातूर) हा काम करीत होता. तर त्यांच्या सोबत एक क्लिनर होता. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टेम्पो आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात आला असतांना त्या ठिकाणी असलेल्या वळणावर चालक दमानंद यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन टेम्पो पलटी झाला. या अपघातात क्लिनरच्या् पोटात लोखंडी रॉड घुसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर चालक दमानंद गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जमादार नागोराव बाभळे, पीराजी बेले, राजेश मुलगीर, प्रभाकर भोंग, महामार्ग पथकाचे शेषराव पोले, राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील जखमी चालक दमानंद यास तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविले. दरम्यान, क्लिनरचा मृतदेह केबीनमध्ये अडकून पडला होता. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने टेम्पो बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. त्यानंतर कटरच्या सहाय्याने केबीन कापून क्लिनरचा मृतदेह बाहेर काढला. क्लिनरचे नांव अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सदर क्लिनर देखील लातुर येथील असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.