भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी वाढतोय:चारशे वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला; उद्धव ठाकरे गटाची टीका

भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी वाढतोय:चारशे वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला; उद्धव ठाकरे गटाची टीका

छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात एकोपा निर्माण केला. आज मात्र महाराष्ट्र दुभंगला आहे व धर्मद्वेषाने पेटला आहे. कुराणाची प्रत कोठे मिळाली तर सन्मानाने परत करा असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र सांगते. मात्र नागपुरात कुराणातील आयती जाळण्याचा प्रकार झाला. राजापुरात होळींचे खांब मशिदीत घुसवून दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात पेटवापेटवी सुरू आहे ती औरंगजेबाच्या नावाने. चारशे वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला आहे. कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी वाढतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माफ करा! अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. दैनिक सामना मधील अग्रलेख देखील वाचा… मुख्यमंत्री फडणवीस हे राणाभीमदेवी थाटात फक्त भाषणे करतात, पण प्रत्यक्षात कृती मात्र काहीच करीत नाहीत हे वारंवार दिसत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दंगल उसळली. पोलिसांवर हल्ले झाले. नागपुरात जाळपोळीचा भडका उडाला. नागपूरला 300 वर्षांचा इतिहास आहे. या 300 वर्षांत कधी दंगल घडल्याची नोंद नाही. मग आताच भडका का उडाला? फडणवीस म्हणतात, हे दंगलखोर बाहेरचे होते. बाहेरचे दंगलखोर शहरात येऊन हैदोस घालीपर्यंत पोलीस काय करीत होते? गृहखात्याचे गुप्तचर झोपा काढीत होते काय? असे प्रश्न निर्माण होतात. बीडमध्ये खंडण्या, हत्यासत्र संपलेले नाही. परभणीतही दंगल झाली. कोकणात होळीच्या सणात नवहिंदुत्ववाद्यांनी दंगलीची ठिणगी टाकली. राज्याचे मंत्री धार्मिक द्वेष वाढेल अशी भाषणे देतात व गृहमंत्री हात चोळत बसले आहेत. याला राज्य करणे म्हणत नाहीत. औरंगजेबाचे महिमामंडन महाराष्ट्रात कोणीच करणार नाही. येथे फक्त छत्रपती शिवरायांचाच जयजयकार होईल. त्यामुळे ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी आणि भाजपमधील नवहिंदुत्ववादी चोंगट्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरुद्ध राजकीय रौद्ररूप धारण केले व महाराष्ट्रातले वातावरण बिघडवले. येथे कारसेवेचीही गरज नाही औरंगजेबाची कबर कायमची उद्ध्वस्त करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आंदोलन करण्याची धमकी दिली. कबर हटविण्यासाठी कारसेवा करण्याची योजना जाहीर केली. औरंग्याच्या कबरीची तुलना ते अयोध्येतील बाबरी मशिदीशी करत आहेत. बाबरीप्रमाणे औरंग्याची कबर तोडू असे हे लोक सांगतात. त्यासाठी हे लोक कुदळ, फावडी, पहारी, जेसीबी, बुलडोझर वगैरे गोळा करायला लागले. ही सरळ सरळ नौटंकी आहे. औरंग्याची कबर तोडायला हा तमाशा करण्याचे कारण नाही. औरंग्या कबरीखाली आहे व तो काही उठून बाहेर येत नाही. कबरीस आता राज्य राखीव सुरक्षा दलाचे संरक्षण आहे. ही कबर भारताच्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असल्याने त्याचे बाप केंद्रात बसले आहेत. केंद्राने लगेच हे संरक्षण हटवावे आणि कबरीस जो संरक्षित वास्तूचा दर्जा दिला तो काढून घ्यावा. म्हणजे ही जमीन मोकळी होईल व संघर्षाचा भडका उडणार नाही. येथे कारसेवेचीही गरज नाही. शिवाजीराजे व संभाजीराजांचे महत्त्व कमी करायचे बाबरीच्या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. उत्तर प्रदेशात कल्याणसिंगांचे भाजप सरकार होते. त्यामुळे संघर्ष झाला. आज केंद्रात मोदी व महाराष्ट्रात फडणवीस आहेत. दोघेही भाजपचे. पुन्हा श्री. फडणवीस यांना अयोध्येतील कारसेवेचा अनुभव आहे. त्यामुळे स्वतः मोदी, फडणवीस, मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार या पाच जणांनी हातात कुदळ-फावडे घेऊन सरकारी आदेश म्हणून औरंग्याच्या कबरीचे उत्खनन करावे. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगल टळेल व माथेफिरूंची डोकी शांत होतील. फडणवीस वगैरे लोकांना शिवरायांपेक्षा औरंग्या अधिक महत्त्वाचा वाटतो हे आता स्पष्ट झाले. शिवरायांचे राज्य धर्माचे, पण सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारे होते. हा विचार भाजपला आधीही मान्य नव्हता आणि आताही मान्य नाही. मुळात छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे हे संघ किंवा भाजपच्या विचारधारेची प्रतीके कधीच नव्हती. आता ते सोयीनुसार ‘जय शिवाजी’, ‘जय संभाजी’ म्हणत आहेत. या लोकांना शिवाजीराजे व संभाजीराजांचे महत्त्व कमी करायचे आहे. त्यामुळे शिवाजीराजे व संभाजीराजे ज्या खलनायकाविरुद्ध लढले आणि त्यांनी ज्याला महाराष्ट्रात गाडले, त्या खलनायक औरंगजेबालाच आधी कबरीसह संपवायचे. खलनायक संपला की, ‘नायक’ शिवाजीराजे व संभाजीराजेही आपोआप संपतील ही यांची चाल आहे. महाराष्ट्र दुभंगला आहे व धर्मद्वेषाने पेटला आहे लोकसभेत भाजपचे ओडिशातील बारगढ येथील खासदार प्रदीप पुरोहित यांनी जाहीरपणे सांगितले, ‘‘आमचे शिवाजी मोदी आहेत. मोदी आधीच्या जन्मात छत्रपती शिवाजी होते.’’ तेव्हा आता भाजपने नव्या शिवाजीला जन्म दिला आहे आणि त्यासाठी मूळ शिवाजी खतम करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. पुन्हा शिवाजीराजांना खतम करायचे तर आधी औरंगजेबाची कबर उखडायची. म्हणजे इतिहास आपोआप नष्ट झाला. महाराष्ट्रात नेमके तेच घडताना दिसत आहे. मोदी यांना छत्रपती शिवाजी ठरवून जे महिमामंडन चालले आहे ते भयंकर आहे. छत्रपतींचे वंशज उदयनराजे (श्रीमंत) व शिवेंद्रराजे भोसले (श्रीमंत) यांना मोदी हेच शिवाजीराजे हे महिमामंडन मान्य आहे काय? छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात एकोपा निर्माण केला. आज मात्र महाराष्ट्र दुभंगला आहे व धर्मद्वेषाने पेटला आहे. कुराणाची प्रत कोठे मिळाली तर सन्मानाने परत करा असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र सांगते. मात्र नागपुरात कुराणातील आयती जाळण्याचा प्रकार झाला. राजापुरात होळींचे खांब मशिदीत घुसवून दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात पेटवापेटवी सुरू आहे ती औरंगजेबाच्या नावाने. चारशे वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला आहे. कारण भाजपच्या ‘पोटात’ नवा शिवाजी वाढतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माफ करा!

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment