बोगस टोल:महाराष्ट्रासह 13 राज्यांत 200 नाक्यांवर दोन वर्षांत 120 कोटींवर डल्ला , बनावट सॉफ्टवेअरने फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून वसुली
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह १३ राज्यांतील सुमारे २०० टोलनाक्यांच्या संगणकांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारखे (एनएचएआय) हुबेहूब सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल कर चुकवेगिरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यात महाराष्ट्रातील दसरखेड टोल (मलकापूर) आणि खानिवडे टोल (दहिसर, सुरत)नाक्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने(एसटीएफ)दोन व्यवस्थापकांना अटक केली आहे. या गैरप्रकाराचा म्होरक्या आलोकसिंह याची चौकशी केल्यावर हा घोटाळा गेल्या दोन वर्षांपासून सुरु असल्याचे समोर आले. यामुळे एनएचएआयला तब्बल २०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आता महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी सूचना देण्यात आली असून चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. या घोटाळ्यात टोल कर वसुली करणारे ठेकेदारांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. एसटीएफने घोटाळ्याचा मास्टरमाइंडसह तीन जणांना अटक केली आहे. या टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. नियम… 50% टोल महामार्ग प्राधिकरण आणि 50%खासगी कंपनीकडे टोलनाका पास करणाऱ्या फास्टॅगविरहित वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जातो. त्यापैकी ५०%रक्कम महामार्ग प्राधिकरणाला मिळते तर ५०%रक्कम खासगी कंपनी अथवा ठेकेदाराला मिळते. परंतु आलोकच्या सॉफ्टवेअरमधून हा टोल वसूल केल्यास प्राधिकरणाला दमडीही मिळत नव्हती. सर्व पैसे तो स्वत:च ठेवत होता. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्होरक्या : आधी एनएचएआयला सॉफ्टवेअर बनवून द्यायचा, नंतर गैरप्रकार सुरू केला मास्टरमाइंड आलोकने एकूण ४२ टोलनाक्यांवर बनावट सॉफ्टवेअर इन्स्टाॅल केले. यात महाराष्ट्र -२, यूपी -९, म.प्र.६, राजस्थान, गुजरात, छत्तीसगडला प्रत्येकी ४, झारखंड-३, पंजाब, आसाम, बंगालला प्रत्येकी २ आणि ओडिशा, हिमाचल, जम्मू-तेलंगणात प्रत्येकी एक. म्हणजे १३ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात याचे जाळे पसरले आहे. यापैकी बहुतांश एकेसीसी कंपनीचे आहेत. त्याचे साथीदार सावंत व सुखान्तूने २०० टोल नाक्यांवर हे बनावट सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे.