दोन्ही पवार कधी एकत्र येणार?:शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, रोहित पवारही स्पष्टच बोलले; ते मुहूर्त शोधत आहेत – संजय शिरसाट

दोन्ही पवार कधी एकत्र येणार?:शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, रोहित पवारही स्पष्टच बोलले; ते मुहूर्त शोधत आहेत – संजय शिरसाट

महाराष्ट्रात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावर अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एका वाक्यातच विषय संपवला. दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार ‘मला माहीत नाही’, असे म्हणाले. शरद पवार यांनी त्यांच्या शैलीत एका वाक्यात उत्तर दिले असले तरी कधी एकत्र येणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यामुळे एकत्र येणार पण कधी एकत्र येणार हे माहीत नाही, असे म्हणणे आहे का? असाही आता अंदाज लावला जात आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत ही फक्त चर्चा आहे- रोहित पवार रोहित पवार यांना दोन्ही पवार कधी एकत्र येणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न जसा तुम्हाला पडला आहे, तसाच अनेकांना पडला आहे. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आजपर्यंत ही फक्त चर्चा आहे, वरिष्ठ पातळीवर पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील यांनी याबाबतीत आम्हाला कुठेही काहीही सांगितलेले नाही, जर आम्हाला काही कळाले तर आम्ही नक्कीच मीडियासमोर येऊन बोलू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कोणत्या वेळेला याचा मुहूर्त ते शोधत आहेत- संजय शिरसाट दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी देखील दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार साहेब आणि अजितदादांची बोलणी सुरू आहेत असे म्हणतात. मात्र याबाबत सध्या भाकीत करणे उचित नाही, परंतु काही दिवसांनंतर तुम्हाला याचे चित्र स्पष्ट होईल. शरद पवार साहेब पूर्वेला जायचे असेल तर पश्चिमेला चाललो असे सांगतात. म्हणून ते जे बोलले मला माहिती नाही याचा अर्थ सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत, फक्त नेमके कोणत्या वेळेला याचा मुहूर्त ते शोधत आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment