बंटी पाटील खुनशी आहेत, कोल्हापूर अविकसित ठेवले:धनंजय महाडिक यांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल

कोल्हापूर येथे भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कॉंग्रेसच्या सभेत विश्वजित कदम म्हणाले होते, मी जर बंटी पाटलांसारखे वागलो, तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, यावरून बंटी पाटील किती खूनशी आहेत हे दिसून येते, अशी टीका महाडिक यांनी केली आहे. सभेत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, जिल्हा अविकसित राहण्यासाठी कारणीभूत बंटी पाटील आहेत. गेली पंधरा वर्षे त्यांच्या ताब्यामध्ये महापालिका होती, चार आमदार होते तरीही विकासकामे झाली नाही. त्यांनी फक्त दोन मेहरबाण्या केल्या आहेत. आयआरबी टोल आणि थेट पाईपलाईनचे काम केले असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, 14 वर्षांपूर्वी त्यांनी याच मैदानावर अडीच वर्षात जर थेट पाईपलाईनचे पाणी आणले नाही, तर निवडणूक लढणार नाही असेही म्हटले होते. मात्र त्यांनी त्यानंतर दोन-तीन निवडणूक लढवल्याची टीका महाडिक यांनी केली. जनतेला पाणी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसतानाही एकट्यानेच पाईपलाईनच्या पाण्याने आंघोळ केली, असा खोचक टोला देखील धनंजय महाडिक यांनी लगावला. मुन्ना महाडिकाचा भांग देखील कोणी वाकडा करू शकत नाही धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीणबद्दल केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, लाडकी बहीण बाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी तातडीने बहिणींची माफी मागितली, पण सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेला ज्या शब्दात बोलले त्यावर त्यांनी माफी मागितली नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत जाऊन सांगत आहेत, की मुन्ना महाडिक यांचा हात तोडा, पाय तोडा. उद्धव साहेब मी तुमची माफी मागतो, मला तुमचा अवमान करायचा नाही, पण मी सांगतो मुन्ना महाडिकाचा भांग देखील कोणी वाकडा करू शकत नाही, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही. उद्धव साहेब आपल्या भाषणाचा कोणतरी गैरफायदा घेतील म्हणून आज हे मला बोलावे लागले, असे धनंजय महाडिक म्हणाले.

  

Share