सीबीआय पथक थेट पासपोर्ट कार्यालयात:अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले, विशेष न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

सीबीआयने थेट मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयात एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पासपोर्ट कार्यालयातील सहाय्यक आणि एका दलालाला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. बनावट पासपोर्ट बनवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कनिष्ठ पारपत्र सहाय्यक अक्षय कुमार मीणा व दलाल भावेश शांतीलाल शहा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अक्षय कुमार मीणा हे कनिष्ठ पारपत्र सहाय्यक असून लोवर परळ येथील पारपत्र सहाय्यक केंद्रावर पडताळणी अधिकारी म्हणून काम करत होते. सीबीआयने या दोघांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 2023-24 या काळात संबंधित अक्षय कुमार मीणा व खासगी दलाल शहा यांनी संगनमताने कट रचत बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून देत होते. तसेच पासपोर्ट देण्यासाठी लाच घेत असल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने आरोपींना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले असून 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार दोघेही 2 जून 2025 पर्यंत पोलिस कोठडीत असणार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआय करत आहे. दरम्यान, राज्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. एसीबीने दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई केली असून त्यानंया 5 लाखांची लाच स्वीकारतान अटक केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागातील तिघांना लाच घेताना अटक केली आहे.